एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना केले संप मागे घेण्याचे कळकळीचे आवाहन


मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या आठवड्यातील बुधवारी मध्यरात्रीपासून सुरु झाला आहे. सध्याच्या घडीला राज्यातील २५० डेपो हे जवळपास बंद आहेत. एसटी सेवा बंद असल्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा फटका बसला आहे. जरी गेल्या आठवड्यात संप सुरु झाला असला, तरी दिवाळीच्या आधीपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे १४ दिवसांपेक्षा जास्त काळ राज्यातील एसटी सेवा कोलमडलेली आहे.

याच दरम्यान एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांसाठी जाहीर आवाहन करण्यात आले नव्हते. उलट एसटी महामंडळाने सोशल माध्यमांद्वारे एसटी देत असलेल्या विविध सेवा सुविधांबद्द्लची माहिती तसेच विविध प्रमुख एसटी डेपोमनधून सुटणाऱ्या एसटीचे वेळापत्रक अशा माहिती देण्याचा सपाटा लावला होता. अखेर एसटी महामंडळाने आज एक निवेदन प्रसिद्ध करत संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. १२ हजार कोटी रुपयांच्या घरात एसटी महामंडळाचा संचित तोटा हा पोहचला आहे. दररोज १५ ते २० कोटी रुपयांचे नुकसान संपामुळे होत आहे. याचा परिणाम महामंडळाला आणि परिणामी एसटी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे. सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

एकीकडे जरी एसटी महामंडळातर्फे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असले, तरी आत्तापर्यंत आंदोलन करणाऱ्या २ हजारच्यावर एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करत कठोर कारवाई देखील महामंडळाने केली आहे. तर दुसरीकरडे चर्चेची दारे खुली असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. पण असे असले तरी एसटी महामंडळाचे हे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत.