संजय राऊतांनी केली कंगना राणावतचा राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्याची मागणी


मुंबई – आपल्या वेगवेगळ्या विषयांवरील वक्तव्यांमुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत कायमच चर्चेत असते. तिने नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 1947 मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळाले, असे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्याबाबतच्या कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. कंगनाचे ते वक्तव्य म्हणजे देशाचा अपमान असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. तसेच कंगनाला देण्यात आलेले राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्याची मागणीही राऊतांनी केली आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, सलमान खुर्शीद हे सुद्धा पुरुषी वेषातील कंगनाबेनच आहेत. अशा प्रकारची वक्तव्ये करुन हे विद्वान म्हणवणारे लोक राहुल गांधींना आणि काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम करतात. जसा कंगनाच्या वक्तव्याने देशाचा अपमान झाला, तसाच या वक्तव्यानेही देशाचा अपमान झाला आहे. पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी खरतर भाजपनेच करायला हवी. राऊत पुढे म्हणाले, कंगनाचे पुरस्कार जोपर्यंत मागे घेत नाहीत. तोपर्यंत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा अधिकार सरकारला नाही. ही संपूर्ण देशाची मागणी आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणावतने स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कंगना एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाली की, स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळाले असेल, तर ते स्वातंत्र्य असेल का? सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचे झाल्यास, या सर्वांना माहित होते की रक्त सांडले, तर हे लक्षात ठेवावे लागेल की हे आपल्या भारतीयांचे नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हते. भीक होती. खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळाले.

वरुण गांधी यांनी देखील कंगनाच्या वक्तव्याबद्दल ट्विट करत कंगनावर निशाणा साधला होता. कधी महात्मा गांधी यांच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या खुन्याचा सन्मान. आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारांना वेडेपणा म्हणू की देशद्रोह?, असे आपल्या ट्विटमध्ये वरूण गांधी यांनी लिहिले होते.