एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल


मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे.

पण, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्रतिनिधी मंडळाने या साऱ्या गोंधळादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली होती. राज ठाकरे यांना यावर तोडगा काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. दरम्यान, राज ठाकरे या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. त्यामुळे एसटी कामगारांचा संप मिटणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.