नवाब मलिकांवर देशद्रोहाचा खटला चालवून येथून आधी हाकलून दिले पाहिजे – नितेश राणे


मुंबई – मागील दोन आठवड्यांहून अधिक काळापासून राज्यामध्ये सुरु असणारा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा दिवसोंदिवस चिघळत चालला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेले एसटी कर्मचारी मुंबईमधील आझाद मैदान येथे आंदोलनाला बसले आहेत. असे असतानाच या ठिकाणी आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी भेट देऊन एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला. पण या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता, ते संतापले. यावेळी नितेश राणे नवाब मलिक यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना पाकिस्तानात पाठवा असेही म्हणाले.

राज्यातील एसटी कर्मचारी हे एकटे नाहीत हे सांगण्यासाठी मी आलो आहे, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी भाजप आहे, असा शब्द आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना देऊन नितेश राणे आझाद मैदानामधून बाहेर पडत असतानाच प्रसारमाध्यमांशी त्यांनी चर्चा केली. नवाब मलिक यांनी केंद्रांने खासगीकरण केलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी भाजपाने रस्त्यावर उतरावे अशी टीका केल्याचा संदर्भ देत यावेळी प्रश्न विचारण्यात आला. नितेश राणे त्यावर उत्तर देताना चांगलेच संतापल्याचे दिसले. नवाब मलिक यांचा एकेरी उल्लेख करत, नवाब मलिक गद्दार आहे. दहशतवाद्यांना साथ देणारे ते देशद्रोही असल्याचे वक्तव्य केले. तसेच पुढे बोलताना, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला आम्ही उत्तर देता कामा नये, असेही नितेश राणे पुढे म्हणाले.

एवढ्यावरच न थांबता मलिक यांचा एकेरी उल्लेख करत त्याला पाकिस्तानमध्ये हाकलून द्या, असेही नितेश राणे म्हणाले. नंतर पत्रकारांवर संताप व्यक्त करताना, तुम्ही पत्रकार मित्रसुद्धा कशाला त्यांची मुलाख घेता, असा प्रश्न विचारला. उद्या मुंबईत बॉम्ब फोडला, तर सर्वात पुढे नवाब मलिक असेल, अशा दहशतवाद्यांची मदत करणाऱ्या देशद्रोहींना आधी हकलवले पाहिजे, असंही नितेश राणे म्हणाले. तसेच मलिक यांना मंत्रीमंडळामध्ये स्थान का देण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही त्यांच्या प्रश्नाला का उत्तर द्यायचे, असा प्रतिप्रश्न नितेश यांनी केला. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. त्याला हकला आधी येथून, असे नितेश राणे म्हणाले.