राज्यात सध्या ‘बिगबॉसचा शो’ सुरू आहे की काय? अशी शंका येते – पंकजा मुंडे


मुंबई – आर्यन खान प्रकरण आणि ड्रग्सवरून राज्यात सध्याच्या घडीला जोरदार राजकारण सुरू आहे. त्यावरुन ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. बिग बॉसचा शो राज्यात सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. तर दुसरीकडे दाऊद, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. राज्याचे हे दुर्दैव आहे. हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते, असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, विरोधकांनी सरकार पडण्याची वाट पाहून नये, तर असे कार्य करावे की ज्या कार्याची दखल घेऊन जनता आपोआपच सत्ताधाऱ्यांकडे पाठ फिरवून तुम्हाला निवडून आणेल, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.