नवाब मलिक यांच्याविरोधात पुरावे देण्यासाठी पत्रकार परिषादांची माळ लावणार – हाजी अराफत शेख


मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेत्यांमध्ये मुंबईतील क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरुन दररोज आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु आहे. आता भाजप नेते हाजी अराफत शेख यांची नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपामध्ये एन्ट्री झाली आहे. दरम्यान हाजी अराफत शेख यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात पुरावे देण्यासाठी पत्रकार परिषादांची माळ लावणार असल्याचे सांगितले आहे. आज दुपारी तीन वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. ते यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांचे उत्तर देत, खळबळजनक खुलासे करणार असल्याचे समजते.

अडीच वर्षे अल्पसंख्यांक समाजाला वेठीस धरून अधोगतीच्या मार्गावर नेणारे भ्रष्ट मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मन-मानी पद्धतीने केलेली कामे, वक्फ बोर्डाची जागा हडपणे, गैरव्यवहार करणे व स्वतःच्या स्वार्थापोटी वक्फ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे यासंबंधी खुलासे करणार असल्याचे हाजी अराफत शेख यांनी सांगितले. नवाब मलिक यांनी सुरुवात केली आहे, हाजी अराफत शेख शेवट करेल, असे ते म्हणाले. मी आजपासून पत्रकार परिषदांचे सत्र सुरू करणार आहे. नवाब मलिकांसोबत कोण-कोण आहेत? हे समोर आणणार. अल्पसंख्याक समाजाच्या मुद्द्यावर आज दुपारी मुंबईत पहिली पत्रकार परिषद होईल.

त्यानंतर दोन दिवसांनी मलिकांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आणणार. त्यानंतर भंगारवाल्याची संपत्ती कोट्यवधींची कशी झाली, याचा खुलासा करणार आहे. मग चरस मलिक कोणाला म्हणतात, यावर भाष्य करेन. तसेच कोणाची मुलगी कोणासोबत पळून गेली, कोणाचा मुलगा रशियाच्या मुलीला घेऊन पसार झाला. हे समोर आणणार आहे. जर चाललेल्या गोष्टी थांबल्या नाहीत, तर आम्ही सगळं समोर आणणार, असे वक्तव्य हाजी अराफत शेख यांनी केले आहे.