स्वतःच्या मर्जीने कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस घेऊ नका, सर्टिफिकेट मिळणार नाही


नवी दिल्ली – केंद्र सरकार लवकरच देशातील कोरोना प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोस बाबतचे धोरण जारी करणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य डॉ. एनके अरोरा यांनी दिली आहे. येत्या 10 दिवसांत ही पॉलिसी येऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या लोकांची कॅटेगिरी यामध्ये दिली जाईल, ज्यांना तिसरा डोस देण्यास प्राधान्य दिले जाईल.

अरोरा यांनी लोकांना आपल्या स्वत:च्या इच्छेनुसार बूस्टर डोस न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, कारण कोविनवर याचा रेकॉर्ड असणार नाही आणि कोणतेही प्रमाणपत्र दिले जाणार नाही. अनेक लोक तिसरा डोस घेत असल्याच्या बातम्या येत असल्यामुळे अरोरा यांनी हा सल्ला दिला आहे. अरोरा म्हणाले की, देशभरातील सेरोपॉझिटिव्ह अभ्यासानुसार, लसीकरण आतापर्यंत प्रभावी ठरले आहे आणि असे कोणतेही कारण समोर आले नाही की लोकांनी लसीकरणासाठी गुपचूप धावपळ करावी.

अरोरा यांच्या मते, देशातील किमान 85% लोकांना पहिला डोस मिळाला आहे. सेरोपॉझिटिव्ह अभ्यासानुसार, लसीकरणाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. दिल्लीतील 97% लोकसंख्या सेरोपॉझिटिव्ह आहे. UP मध्ये 88%, तेलंगणात 85% लोकसंख्या सेरोपॉझिटिव्ह आहेत. अरोरा म्हणतात की, देशात लसीची कमतरता नाही. 30-35 कोटी डोस दर महिन्याला तयार केले जात आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला विनाकारण डोस दिले जावेत.

अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. आपण इतर अनेक देशांपेक्षा चांगल्या स्थितीत आहोत. अरोरा यांचे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा तेलंगणाच्या आरोग्य अधिकार्‍यांसह अनेक अधिकार्‍यांनी उघडपणे तिसर्‍या डोसची वकिली केली आहे. तिसरा डोस कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

काल कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीचे एमडी डॉ. कृष्णा एल्ला यांनी म्हटले होते की, दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांनी बूस्टर डोस घेणे योग्य ठरेल. पण, याबाबतचा अंतिम निर्णय सरकारने घ्यायचा आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे, परंतु भारतात अद्याप याची सुरुवात झालेली नाही.