मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवरील शस्त्रक्रिया यशस्वी


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मानेच्या दुखण्यामुळे HN रिलायन्स रग्णालयात दाखल झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया आज सकाळी साडेसात वाजता सुरु झाली होती. सुमारे तासभर वरिष्ठ आँर्थो सर्जन डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. सकाळी पावणे नऊ वाजता ऑपरेशन यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या ऑपरेशन थिएटरमध्येच असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही वेळ ते भूल दिल्यामुळे विश्रांती घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑपरेशनची माहिती त्यांच्या कुटुंबियांनाही देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान यंदा देखील मुंबईतच हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदा देखील देशात आणि राज्यात अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. सोबतच मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच घेतले जाईल, असे बोलले जात आहे. नागपूरात 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन प्रस्तावित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी देखील करण्यात आली आहे. पण आता अधिवेशन नागपुरात होते की मुंबईत याकडे लक्ष लागून आहे.