भाजपने एका वर्षात प्रचारासाठी खर्च केले कोट्यवधी रुपये


नवी दिल्ली – या वर्षाच्या सुरुवातीला आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मजबूत पैसा खर्च केला असून जवळपास 60 टक्के तृणमूल काँग्रेस शासित राज्यात प्रचारासाठी वापरले. भाजपने निवडणूक आयोगाकडे याबद्दलचे विवरण सादर केले आहे. या रकमेबद्दलची माहिती त्यावरुन मिळत आहे.

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या विवरणानुसार, निवडणूक प्रचारासाठी भाजपने २५२ कोटी रुपये खर्च केले आहेत. खर्च केलेल्या २५२ कोटी २ लाख ७१ हजार ७५३ रुपयांपैकी ४३.८१ कोटी आसाम निवडणुकीसाठी आणि ४ कोटी ७९ लाख रुपये पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी होते.

तामिळनाडूमध्ये, जिथे द्रविड मुन्नेत्र कळघमने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी एआयएडीएमकेकडून सत्ता हिसकावून घेतली, तिथे फक्त २.६ टक्के मते मिळविणाऱ्या भाजपने प्रचारात २२ कोटी ९७ लाख रुपये खर्च केले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या विरोधात भाजपने जोरदार प्रचार केला. राज्यात त्यांनी १५१ कोटी खर्च केले. केरळमध्ये, जेथे विद्यमान एलडीएफने सत्ता कायम ठेवली, तेथे भाजपने २९ कोटी २४ लाख खर्च केले. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली निवडणूक खर्चाची विवरणपत्रे निवडणूक आयोगाने आता सार्वजनिक केली आहेत