किरण गोसावीविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल


पुणे – भोसरी पोलीस ठाण्यात अनेक तरुणांची नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या किरण गोसावी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. भोसरी परिसरातील विजयकुमार सिद्धलिंग कानडे या तरुणाची परदेशात हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी लावतो असे म्हणून २ लाख २५ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. भोसरी पोलिसात त्यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून आरोपी किरण गोसावीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ ला नोकरीसाठी फिर्यादी विजयकुमार कानडे यांनी ऑनलाइन अर्ज केला होता. तेव्हा, त्यांना वेगवेगळ्या जॉब पोर्टल साईट्सवरून नोकरीच्या ऑफर येत होत्या. त्याचवेळी शिवा इंटरनॅशनल यांच्याकडून २१ मार्च २०१५ ला फिर्यादी यांच्या मेल आयडीवर नोकरीसंदर्भात मेल आला. त्यामेलमध्ये परदेशात हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी असल्याची माहिती दिली होती. तेव्हा तात्काळ फिर्यादीने त्यांचा बायोडेटा पाठवला.

आरोपी किरण गोसावीने विजयकुमार यांचा विश्वास संपादन करून परदेशात नोकरी लावतो असे सांगून विजयकुमार यांच्याकडून नाशिक फाटा येथे ३० हजार घेतले. त्यानंतर शिवा इंटरनॅशनल यांच्या लेकसिटी मॉल, घोडबंदर रोड, माजीवाडा, ठाणे येथील ऑफिसमध्ये जाऊन दिनांक ५ एप्रिल २०१५ रोजी रोख ४० हजार हजार भरले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच फिर्यादी यांनी किरण गोसावी यांच्या सांगण्यावरून आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात २० हजार पाठवले होते. त्यानंतर ठाणे येथील ऑफिसमध्ये जाऊन १० हजार भरले होते. विजयकुमार यांच्याकडून वेळोवेळी आणि ऑनलाइन पद्धतीने एकूण २ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.