जन धन खात्यातून बिटकॉइन घोटाळ्यातील आरोपींनी लांबवले ६ हजार कोटी रुपये, कुमारस्वामींचा आरोप


बंगळुरु – जन धन खाती हॅक करून बिटकॉइन घोटाळ्यातील आरोपींनी प्रत्येक खात्यातून २ रुपये ट्रान्सफर करत सुमारे ६ हजार कोटी रुपये चोरीला गेले असल्याचा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. मला सांगण्यात आले आहे की जन धन खाते हॅक झाले आहे. जनधन खाते हॅक करून प्रत्येक खात्यातून २ रुपये ट्रान्सफर केले गेले. मला माहित नाही की ही बाब किती खरी आहे. पण एकट्या जनधन खात्यांमधील रकमेची किंमत एकूण ६ हजार कोटी रुपये असल्याचे कुमारस्वामी म्हणाले.

हा संपूर्ण प्रकार लपविण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करू शकते, अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. भारतासह अनेक देशांमध्ये बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता नाही. कर्नाटक सरकारला बिटकॉइन घोटाळ्याने चांगलाच धक्का बसला आहे. शहरातील हॅकर श्रीकृष्ण उर्फ श्रीकी याच्याकडून अधिकाऱ्यांनी ९ कोटी रुपयांची बिटकॉइन्स जप्त केल्यानंतर या घोटाळ्यात राजकारणातील प्रभावी व्यक्ती सामील असल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. सरकारी पोर्टल हॅक करणे, डार्क नेटद्वारे ड्रग्ज मिळवणे आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे देणे असे आरोपही श्रीकृष्णावर आहेत.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बिटकॉइन घोटाळ्यामुळे राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे आधीप्रमाणे पुन्हा एकदा राज्यात भाजपचा तिसरा मुख्यमंत्री दिसू शकतो, असा दावा काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी केला आहे. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.