येतेय हायपरसोनिक विमान, दिल्ली ते लंडन दीड तासात होणार प्रवास

विमान उत्पादक क्षेत्रातील स्टार्टअप हर्मेयुस ने त्यांच्या हायपरसोनिक विमानावरून पडदा हटविला असून क्वार्टरहर्स असे या विमानाचे नामकरण केले आहे. हायपरसोनिक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या पाचपट वेग. या कंपनीने हायपरसोनिक विमानाचा प्रोटोटाईप बनविला असून या विमानातून अजून माणसाना प्रवासाची परवानगी नाही. पण पुढच्या वर्षात ते आकाशात झेपावेल असे जाहीर केले गेले आहे. मंगळवारी कंपनीने प्रोटोटाईप हायपरसोनिक लाँच केल्याची घोषणा केली आहे.

या प्रकल्पात अमेरिकन हवाई दलाने ६ कोटी डॉलर्स म्हणजे ४५० कोटींचे अर्थसहाय्य कंपनीला दिले आहे असे समजते, ऑगस्ट मध्ये हे पैसे दिले गेले तेव्हाच कंपनीने १८ महिन्यात हे विमान आकाशात उड्डाण करेल असे जाहीर केले होते. अश्या प्रकारच्या विमानात अमेरिकेला विशेष रस आहे. कारण  अमेरिकन वायुसेना भविष्यात एग्झीक्यूटिव्ह क्लास साठी असे विमान वापरण्याचा विचार करत आहे. यामुळे अगदी कमी वेळात अतिमहत्वाच्या व्यक्ती जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सहज पोहोचू शकणार आहेत.

कंपनीचे सीईओ स्कायलर शेफोर्ड म्हणाले आम्ही चार महिन्यात या विमानाचे डिझाईन आणि उत्पादन केले आहे. त्याच्या इंजिन चाचण्या झाल्या आहेत. टर्बाइन बेस्ड कंबाइंड सायकल इंजिन सोबत रॅमजेट्स व स्क्रॅमजेट्स इंजिनचा वापर यात केला गेला आहे. रॅमजेट्स व स्क्रॅमजेट्स इंजिन वाहनाला अतिशय वेग प्रदान करणारी इंजिन आहेत पण त्याच्यासाठी हायपर सुपरसोनिक यानाची गरज असते. ही याने सामान्य रनवेवर उतरविणे अवघड असते. म्हणून हायपरसोनिक विमानात टीबीसीसी इंजिन दिले गेले असून त्यामुळे हे विमान सामान्य रनवे वर उतरू शकेल आणि उड्डाण करू शकेल. हवेत विमान असेल तेव्हा रॅमजेट्स व स्क्रॅमजेट्स इंजिन वापरली जातील.

हायपरसोनिक विमानांचा वेग ताशी किमान ४८२८ किमी व त्यापेक्षा अधिक असू शकतो. त्या दृष्टीने विचार केला तर हे विमान दिल्ली ते लंडन हे ७५०० किमी चे अंतर दीड तासात पार करू शकेल. सध्याच्या अत्याधुनिक विमानांना हे अंतर पार करण्यासाठी किमान आठ तास लागतात.