पूर्वांचल एक्स्प्रेसवे वर उतरणार राफेल लढाऊ विमान

लखनौ गाझीपुर पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर १४ नोव्हेंबर रोजी भारतीय हवाई दलाचे राफेल लढाऊ विमान उतरविले जाणार असून या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यावेळी या हायवेवर बनलेल्या रनवेवर भारतीय हवाई दलाची सुखोई सह अनेक लढाऊ विमाने लँडिंग आणि टेकऑफ करणार आहेत त्यात राफेलचा समावेश केला गेला आहे. भारतीय हवाई दलाच्या या एअरशोच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शक्तीचे प्रदर्शन केले जाणार आहे. याच रनवेवर पंतप्रधान मोदी आणि रक्षामंत्री राजनाथ सिंग हर्क्युलस विमानातून उतरणार आहेत असे समजते.

सुलतानपूरच्या कुरेभाट गावाजवळ ३.२ किमी लांबीचा रनवे केला गेला आहे. सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी या एक्स्प्रेसवे चे लोकार्पण करणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. वायुसेनेची अनेक लढाऊ विमाने या रनवे वर लँडिंग आणि टेकऑफ करतील. पण राफेल प्रथमच येथे उतरविले जाणार आहे. स्थानिकांना या शो बद्दल मोठी उत्सुकता आहे.

या शो मधून या प्रदेशाच्या विकासा बरोबर भारताच्या वाढलेल्या लष्करी ताकदीचा संदेश जगाला दिला जात आहे. राफेल लढाऊ विमानाचा सर्वाधिक वेग ताशी २१३० किमी असून त्याची मारक क्षमता ३७०० किमीची आहे. भारताने फ्रांस कडून अशी ३६ राफेल विमाने विकत घेतली असून त्यामुळे हवाई दलाची ताकद प्रचंड वाढली आहे. हि विमाने अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत आणि हवेतून हवेत तसेच हवेतून जमिनीवर अचूक मारा करू शकतात.