नीरजचे लक्ष्य बायोपिक नाही तर ९० मीटर भालाफेक

टोक्यो २०२० ऑलिम्पिक मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा त्याच्या पुढच्या सरावासाठी सज्ज झाला असून सध्या तो फिटनेस वर काम करत आहे. पतियालाच्या एनआयएस शिबिरात तो प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला असून आता त्याने सर्व लक्ष्य आगामी स्पर्धेत ९० मीटर भालाफेक करण्यावर केंद्रित केले आहे.

नीरजला नुकताच देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जात आहे आणि देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचे खूप कौतुक झाले आहे. नीरज म्हणतो, आता माझ्याबद्दल देशवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत त्यामुळे माझी कामगिरी खराब झाली तर जसे कौतुक झाले तसेच निंदेचे धनी होण्याची वेळ येईल याची कल्पना आहे. त्यामुळे लवकरात लवकर ९० मीटर भालाफेक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

नीरजवर बायोपिक येणार असल्याची जोरदार चर्चा होते आहे त्यासंदर्भात टाईम्सनाऊ समिट २०२१ मध्ये बोलताना नीरज म्हणाला, बायोपिक थांबू शकते पण पदक थांबू शकत नाही. त्याला बायोपिक साठी विचारणा झाली आहे पण पुढचे वर्ष अधिक महत्वाचे आहे. त्या वर्षात राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत स्वतःचे रेकॉर्ड मोडून त्याला ९० मीटर भालाफेक करून आणखी पदके मिळवायची आहेत. जास्त पदके मिळविली तर त्याच्यावरचा चित्रपट अधिक हिट ठरेल अन्यथा चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता असल्याचे त्याने सांगितले.