गुजरातमधील एनसीबीचे पथक काय काम करत आहे – संजय राऊत


मुंबई – राज्यात सध्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन मोठा गदारोळ माजलेला आहे. या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र जोरदार गाजत आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही केलेल्या कारवाईमुळे टीकाटिपण्ण्या करण्यात आल्या. आता एनसीबीला शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही टोला लगावला आहे.

गुजरातमध्ये नुकतेच ३५० किलो ड्रग्ज आढळून आल्याची बातमी समोर आली आहे. हे ड्रग्ज गुजरातमधील द्वारका भागातून जप्त करण्यात आले. एनसीबीने याकडेही लक्ष द्यावे, असे राऊत यांनी सुचवले आहे. राऊत याबद्दल माध्यमांशी बोलताना म्हणाले, द्वारकेत ड्रग्ज सापडणे ही चिंतेची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना ज्यांनी पाव ग्रॅम वगैरे ड्रग पकडून जागतिक किर्ती-ख्याती प्राप्त केली, एक ग्रॅम, पाव ग्रॅम, अर्धा ग्रॅम त्यांनी या ३५० किलो ड्रग्जचा अभ्यास करावा. याआधीही गुजरातमध्ये साडेतीन हजार किलो साधारण २५ ते ३० हजार कोटी किमतीचे ड्रग्ज सापडले होते, त्याच गुजरातमध्ये हे साडेतीनशे किलो म्हणजे १०० कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे. आता त्यामध्ये गुजरातमधील सिनेसृष्टी, काही श्रीमंतांची मुले अडकली असतील, त्या लोकांनी पाहावे आता. एनसीबीचे पथक नक्की गुजरातमध्ये काय काम करत आहे …हे सुद्धा देशाला कळावे.