गुजरातमध्ये 350 कोटींच्या ड्रग्जसह ठाण्यातील भाजीविक्रेत्याला अटक


मुंबई – एकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण ड्रग्ज प्रकरणावरुन गाजत आहे. महाराष्ट्राला ड्रग्जच्या नावाखाली बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. ड्रग्जवरुन महाराष्ट्रामध्ये रणकंद सुरु असतानाच ड्रग्जचा मोठा साठा गुजरातमध्ये दुसऱ्यांदा हस्तगत करण्यात आला आहे. तब्बल साडे तीनशे कोटींचे ड्रग्ज गुजरातमधील द्वारकाच्या खंभालिया परिसरातून जप्त करण्यात आले. हेरॉईन आणि एमडी ड्रग्जचा ज्यात समावेश आहे. गुजरातमधील यापूर्वी मुंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानातून या ड्रग्जची तस्करी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गुजरात पोलिसांनी अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. गुजरात पोलिसांनी सज्जाद घोसी, सलीम कारा आणि अलीभाई कारा या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यातील सज्जाद हा ठाण्यातील मुंब्र्याचा रहिवासी आहे. सज्जाद हा भाजीपाला विक्रेता असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र कनेक्शन लागल्यामुळे हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

जवळपास 16 किलो हेरॉईन गुजरातमधील स्थानिक पोलिसांनी जप्त केले आहे. हेरॉईनसोबत 66 किलो मेफेड्रोन ड्रग्जही पकडण्यात आले आहे. जवळपास 350 कोटी रुपये याची किंमत असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज पाकिस्तानमधून समुद्राच्या मार्गे येत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड मारत ड्रग्ज जप्त केले.

एक व्यक्ती ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. वांकानेर रस्त्यावर सापळा रचत अटक करण्यात आले. दोन बॅग या आरोपीकडून जप्त करण्यात आल्या. यामध्ये एका बॅगमध्ये 15 किलो तर दुसऱ्या बॅगमध्ये 45 किलो ड्रग्ज होते.

विविध प्रकारचे ड्रग्ज स्थानिक पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत होते. शहजाद याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मध्ये 6.168 किलो मेथामफेटामायन (एमडी ड्रग) आणि 11.48 किलो हेरॉईनचा समावेश आहे. याची एकूण किंमत 88,25,50,000 एवढी असल्याचे समजते. शहजादशिवाय सलीम कारा आणि अली कारा यांच्याकडूनही ड्रग्जची 47 पॅकेट्स जप्त करण्यात आली. याची किंमत 235 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. 88 आणि 235 असे जवळपास 350 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या आरोपींद्वारे मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होईल, असे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले.