कंगना राणावतच्या स्वातंत्र्यासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरुन राजू शेट्टी संतापले


बुलडाणा – एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना अभिनेत्री कंगना राणावतने भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सर्वच स्तरातून तिच्या या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला जात आहे. स्वातंत्र्यासारख्या मोठ्या विषयावर बोलण्याची कंगना राणावत या बाईची औकात आहे का, हे आधी तिने तपासून पहावे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुलडाण्यातील चिखली येथे बोलताना दिली आहे.

शेट्टी पुढे बोलताना म्हणाले, भगतसिंग पासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस पर्यंत स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी देखील देश एक केला होता आणि कंगना राणावत सारख्या एखाद्या नटीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही, तर संपूर्ण देशाचा अपमान असल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

कंगना राणावतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल ८ नोव्हेंबरला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंगनाने या पुरस्कार सोहळ्यानंतर ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

१९४८ मध्ये देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला २०१४ मध्ये खरे स्वातंत्र्य मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. आता मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत असल्याचे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडले जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे असल्याचे कंगना म्हणाली होती.

एक कलाकार म्हणून नाही, तर सामान्य नागरिक म्हणून मी माझ्या सोशल मीडियावर सक्रीय असते. मी तिथे कधीही माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करत नाही. मी तिथे नेहमीच देशाचे मुद्दे मांडत असल्याचेही कंगनाने सांगितले. दरम्यान कंगनाच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या या वक्तव्यावरुन तिला ट्रोलही केले जात आहे.