भेटीला आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसमोर राज ठाकरेंनी ठेवली अट


मुंबई – परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्यामुळे ‘ना काम, ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये, यासाठी पुढाकार घेत संप मागे घेण्याचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे. पण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची या साऱ्या गोंधळादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्रतिनिधी मंडळाने मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांनी यावेळी भेटीच्या सुरुवातीलाच आत्महत्या न करण्याची अट कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसमोर ठेवली.

एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. राज यांनी याचसंदर्भात या बैठकीच्या सुरुवातीलाच चिंता व्यक्त केल्याचे पहायला मिळाले. आत्महत्या करणाऱ्यांचे मी नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल, असे राज यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी स्पष्ट शब्दांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाला सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधिक मंडळातील सदस्यांनी राज ठाकरेंसमोर आपले म्हणणे मांडताना आम्ही महाराष्ट्राची सेवा करत असून आमच्या पगाराच्या वेळेसच पैसे कसे नसतात असा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्राची आम्ही सेवा करत आहोत, महाराष्ट्राला जोडत आहोत. पण दरवेळी आमच्या पगाराच्या वेळेस पैसे कसे नसतात. आता या १२ दिवसांच्या संपानंतर विलीनीकरण समिती स्थापन झाली, न्यायलयाची पुढची तारीख आली आणि हाती काही लागले नाही, तर बायकोला काय सांगायचे?, अशा शब्दांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधिक मंडळाने राज यांच्यासमोर व्यथा मांडली.

आता पगार नाही वाढला तर काय करणार? आधीच १२ दिवस विदआऊट पे झाले आहे. विलीनीकरण न्यायालयाची तारीख येईल फटाके वाजतील. पण हाती काहीच आले नाही तर काय? त्यामुळे आयोग लागू करा आणि नंतर विलीनीकरण करा, अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारच्या निर्वाचनाला जो पगार देता तोच आम्हाला द्या. सरकार विलीनीकरणासंदर्बात तीन आठवडे मागत आहे, आम्ही एक महिना घ्यायला तयार असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधिक मंडळाने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे.

हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्ताव मांडा, अर्थसंकल्पात तरतूद करा. आता पगार नाही मिळाला आणि अन्याय झाला तर ३७ आत्महत्या झाल्यात त्याचा आकडा ३१७ असेल, अशी भितीही या अधिकाऱ्यांनी राज यांच्यासमोर व्यक्त केली. साहेब, आमच्या घरी दिवाळी झाली नाही. दिवाळी संपूर्ण महाराष्ट्र साजरी करत असताना आम्ही मात्र दिवाळीला दारात बसून होतो. आता हा प्रश्न फक्त तुम्हीच सोडवू शकता. हवे तर पाया पडतो, पण तुम्ही हा प्रश्न सोडवून द्या. विलीनीकरण कधी करायचे ते करा, पण आयोग लागू करा, असे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी राज यांना म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव मांडून केंद्राकडे पाठवून आणि विलीनीकरण करु घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी या प्रतिनिधिंनी राज यांच्याकडे केली.