गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जच्या साठ्यावरून नवाब मलिकांच्या एनसीबीला कानपिचक्या


मुंबई – ३५० कोटी रुपयांचे ड्रग्ज गुजरातच्या द्वारकामध्ये सापडल्यानंतर आता या मुद्द्यावरून वातावरण तापू लागले आहे. भाजपकडून यासंदर्भात आत्तापर्यंत ड्रग्ज प्रकरणावरून आरोप केले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आता यावरून निशाणा साधला आहे. यावरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. गुजरातमधून हा सगळा ड्रग्जचा खेळ चालतो आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

गुजरातच्या द्वारकामधून आज तब्बल ३५० कोटी किमतीचे ड्रग्ज सापडल्यामुळे आता गुजरात ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनू लागले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. नवाब मलिक यांनी यावरून गुजरात सरकारमधील एका मंत्र्याचे देखील नाव घेतले आहे.

मुंद्रानंतर द्वारकामध्ये देखील ३५० कोटींचे ड्रग्ज पकडले गेले. हा योगायोग आहे का? मनीष भानुशाली, धवल भानुशाली, किरण गोसावी, सुनील पाटील हे सगळे लोक वारंवार अहमदाबादमध्ये नोवाटेल आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहिले आहेत. त्यांचे गुजरातचे मंत्री किरीटसिंह राणा यांच्याशी जवळचे संबंध आहेत. ड्रग्जच्या खेळाचे हे सगळे खेळाडू आहेत. आता प्रश्न असा उभा राहातो की गुजरातहून तर ड्रग्जचा खेळ नाही ना चालत?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

३ ग्रॅम, २ ग्रॅमची राज्यातून कारवाई करून, सेलिब्रिटींची परेड करून लोकांचे लक्ष विचलित केले जावे आणि गुजरातमधून ड्रग्जचा धंदा अविरतपणे चालत राहावा, असे नियोजन आहे का ही शंका लोकांच्या मनात उभी राहात आहे. मुंद्रा पोर्टचा तपास एनआयएकडे आहे. साडेतीनशे कोटींचे ड्रग्ज द्वारकामध्ये पकडले गेले. आशा आहे की याचा तपास योग्य दिशेने होईल. कोण किती मोठा आहे, किती प्रभावी आहे, कोणत्या पक्षाचा नेता आहे, हे न पाहाता एनआयए आणि एनसीबीचे विभागीय संचालक किंवा एनसीबीचे डीजी योग्य पद्धतीने तपास करावा. गुजरातमधून ड्रग्जची सगळी खेप येत असेल, देशात पसरत असेल, तर एनसीबीचे डीजी यावर कारवाई करतील आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम करतील, अशी आशा असल्याचे देखील यावेळी मलिक म्हणाले.