वक्फ बोर्ड कार्यालयावर पडलेल्या ईडीच्या छाप्यांवर नवाब मलिकांचे स्पष्टीकरण


मुंबई – ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. ईडीने या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आहे. ईडीने पुण्यात एकूण ७ ठिकाणी छापे टाकल्याचे वृत्त होते. हे छापे मनी लाँड्रिंग प्रकरणी टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा तपास वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणावर नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.

नवाब मलिक म्हणाले, वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडलेले नाही. ताबूत इनाम इंडोमेंट बोर्ड ट्रस्ट, तालुका मुळशी याचा वक्फ बोर्ड अंतर्गत नोंद आहे. वक्फ बोर्डाचे काम पार्दशकपणे सुरू आहे. काही वृत्तानुसार ईडी नवाब मलिकांच्या घरापर्यंत येईल, असे ऐकले. माझ्या घरापर्यंत ईडी आली, तर त्यांचे स्वागत करेन. पण जी छापेमारी सुरू आहे, ती ताबूत इनाम इंडोमेंट बोर्ड ट्रस्टवर आहे. ईडीला या एका ट्रस्टची नाही तर वक्फच्या नोंद असलेल्या ३० हजार संस्थेची माहिती मी देतो, त्यांनी चौकशी करावी. आमच्या पारदर्शक कामात ईडीचा सहयोग मिळत असल्यामुळे त्यांचे स्वागत आहे.

नवाब मलिक अशा कारवाईमुळे घाबरतील, असे काही लोकांना वाटते. ईडीच्या या कारवाईत महाराष्ट्र सरकार, वक्फ बोर्ड मदत करेल. पण अन्यायाविरुद्ध माझा सुरु असलेला लढा सुरु आहे. काही लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी मी लढाई सुरू केली आहे. केंद्रीय संस्थेत असलेली घाण स्वच्छ करण्याचे अभिायान आम्ही हाती घेतले आहे. त्यामुळे अशा कारवाईची चर्चा करुन माझी प्रतिमा मलिन होऊ शकत नसल्याचे नवाब मलिक म्हणाले.

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नवाब मलिक यांनी याच दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील राज्यातील ड्रग्ज पेडलर्सला संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांनी एकमेकांवर केला होता. रोज नवनवे खुलासे या प्रकरणात होत असताना आता मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केल्याचे वृत्त होते. दरम्यान वक्फ बोर्ड कार्यालयावर छापे पडले नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.