नवाब मलिक यांच्या मुलीने देवेंद्र फडणवीसांना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस!


मुंबई – राज्यात आर्यन खान प्रकरणापासून सुरू असलेला वाद अजून शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. सुरुवातीला फक्त एक ड्रग्ज प्रकरण असलेला हा वाद आता राजकीय झाला आहे. सातत्याने एनसीबीवर आणि त्यासोबतच भाजपवर देखील नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. पण त्यावर आता नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना थेट ५ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस निलोफर खान यांनी पाठवली आहे, फडणवीसांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकला जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.


यासंदर्भातील माहिती निलोफर खान यांनी ट्विट करून दिली आहे. चुकीच्या आरोपांमुळे आयुष्य उद्ध्वस्त होतात. एखाद्या व्यक्तीने आरोप करताना किंवा निषेध करताना आपण काय बोलत आहे याचे भान ठेवायला हवे. देवेंद्र फडणवीसांनी माझ्या कुटुंबावर लावलेल्या चुकीच्या आरोपांसाठी ही अब्रुनुकसानीची नोटीस मी पाठवली आहे. आता आम्ही मागे हटणार नसल्याचे या ट्विटमध्ये निलोफर खान यांनी म्हटले आहे.

फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. ते जेव्हा कोणतीही गोष्ट बोलतील, तर तिची खातरजमा त्यांनी करणे आवश्यक आहे. ते सातत्याने म्हणाले की, समीर खान यांच्याकडे ड्रग्ज सापडले. पंचनाम्यात स्पष्टपणे म्हटलेले आहे की आमच्याकडे काहीही सापडलेले नसल्यामुळे सातत्याने तुम्ही एकच आरोप करत आहात हे योग्य नाही. त्यांना आम्ही नोटीस पाठवली आहे. पाहुयात यावर त्यांचे काय म्हणणे असल्याची प्रतिक्रिया एबीपीशी बोलताना निलोफर खान यांनी दिली आहे.