कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्याला बॉसने फोन अथवा मेसेज करणे बेकायदेशीर!


पोर्तुगाल – कोरोनाच्या महामारीने जगभरातील लोकांच्या कामाच्या पद्धतींमध्ये देखील बदल आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगाराच्या पद्धती बदलाव्या लागल्या. बहुतांश ठिकाणी कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम सुरु करण्यात आले. अनेक कंपन्यांमध्ये अद्यापही वर्क फ्रॉम होम सुरु आहे. पण पोर्तुगालमध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा कायदा लागू करण्यात आला आहे. जो सध्या फारच चर्चेत आला आहे.

कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्याला बॉसकडून फोन किंवा मेसेज करणे आता बेकायदेशीर असेल. अनेकांना आनंद देणारा हा निर्णय असला, तरी हा निर्णय आपल्या देशात नाही. यासंदर्भात पोर्तुगालमध्ये कायदा बनवण्यात आला आहे. त्यानुसार ऑफिसच्या कामकाजाच्या वेळेआधी आणि कामकाजाची वेळ संपल्यानंतर कामासंदर्भात फोन, मेसेज, ई-मेल करणाऱ्या बॉसला आता शिक्षा होणार आहे. तर, संबंधित कंपनीला दंड भरावा लागेल. कोरोनाच्या दोन लाटांमध्ये वर्क फ्रॉम होमला स्वीकारण्यात आल्यानंतर अनेक कंपन्या निश्चित वेळेनंतरही कर्मचाऱ्यांना कामाचे बंधन घालत होत्या. त्याविषयी तक्रारी आल्यानंतर सत्ताधारी पक्षाने नवा श्रमकायदा आणला आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना वीज आणि इंटरनेट बिल देणे बंधनकारक असेल.

जगभरात या कायद्यानंतर वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. या निर्णयाचे काही लोक स्वागत करत आहेत, तर काहींचे म्हणणे आहे की, या नियमांमुळे कामावर परिणाम होऊ शकतो. वर्क फ्रॉम होमची वेळ संपल्यानंतर कोणत्याही कंपनीचा बॉस आपल्या कर्मचाऱ्याला फोन कॉल जरी केला तरी शिक्षा होऊ शकते.

आता काहीसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. यानंतर अनेक ठिकाणची कार्यालये सुरु झाली आहेत. तर अनेक कर्मचारी अद्यापही घरुनच काम करत आहेत. तर काहींची कार्यालये सुरु झाली आहेत. दरम्यान कोरोना काळात लोकांचा तणाव जास्त वाढला आहे. यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. पोर्तुगाल सरकारने रिमोट वर्किंग अधिकाधिक सोपे व्हावे याकरिता हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार हा कायदा त्या संस्था, कंपन्यांना लागू नाही, ज्याठिकाणी 10 पेक्षा कमी कर्मचारी काम करतात.