फडणवीसांना राऊतांचा ‘डुक्करासोबत कुस्ती’वाल्या ट्विटवरुन टोला


मुंबई – मागील दीड महिन्यांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासंदर्भात सुरु असणाऱ्या वादामध्ये आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक विरुद्ध माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आरोप प्रत्यारोपांच्या सत्रादरम्यानच काल एका इंग्रजी लेखकाचे वाक्य ट्विट करत मलिक यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. आता त्यावरुनच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस एनसीबीमध्ये सुरु असलेल्या वसुलीच्या लढाईला दुसरीकडे वळवण्याचे काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्या अधिकाऱ्याचे जुने संबंध असल्याने ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांवर आरोप करतात की अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत. अंडरवर्ल्डच्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले? मुन्ना यादव नावाचा एक कुख्यात गुंड ज्याच्यावर हत्येपासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि तो तुमचा राजकीय साथीदार आहे. त्या मुन्ना यादवला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष बनवले होते की नाही. मलिक यांनी असे अनेक सवाल बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले. तर, या आरोपानंतर ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मलिकांना प्रत्युत्तर दिले.


मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यांनी ट्विटमध्ये एका इंग्रजी लेखकाचे वाक्य शेअर केले. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा विचार फडणवीस यांनी ट्विटवरुन ‘आजचा विचार’ या कॅप्शनसहीत शेअर केला. आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलो आहे. डुकरासोबत कुस्ती खेळल्याने चिखल आपल्याच अंगाला लागतो आणि तेच डुकराला आवडते, असा आशय फडणवीसांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये आहे.

त्यावरुन राऊत यांनी “चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला… बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला, असे रामदास फुटाणेंच्या नावे असणारे वाक्य ट्विट केले आहे. तत्पूर्वी राऊत यांनी राज्यातील आरोप प्रत्यारोपांच्या सत्रावरुन नाराजी व्यक्त केली. हे आरोप-प्रत्यारोपाच राजकारण थांबले पाहिजे. या आरोपांच्या चिखलफेकीत मोठ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. नवाब मलिकांचे आरोप संतापातून होत आहेत. काल मी राज्यपालांना भेटलो त्यांनी देखील यावर चिंता व्यक्त केली, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली.