ईडीची नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी


मुंबई – ईडीने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. ईडीने या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण ७ ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. हे छापे मनी लाँड्रिंग प्रकरणी टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा तपास वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे सुरू करण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील नवाब मलिक यांनी राज्यातील ड्रग्ज पेडलर्सला संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांनी एकमेकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप केले होते. रोज नवनवे खुलासे या प्रकरणात होत असताना आता मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे.

३ नोव्हेंबरला इडीकडे मी तक्रार दिली होती. वक्फ बोर्डाच्या मालकीची ही चार हेक्टर जागा एका ट्रस्टची असल्याचे दाखवण्यात आले आणि ही जागा या ट्रस्टकडून शासनाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिग्रहित केली. अधिग्रहित केल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची झाली आणि त्यापोटी शासनाने नऊ कोटी साठ लाख रुपये त्या ट्रस्टला दिले. वक्फ बोर्डाच्या सीईओंनी त्यासाठी एनओसी दिली होती. त्यामुळे यामध्ये मोठे लोक सहभागी असू शकतात. यामध्ये मी नवाब मलिकांचे नाव घेत नाही, पण यामध्ये मोठे लोक असू शकतात. हिंजवडी आयटी पार्क जवळ असलेली ही चार हेक्टर जागा आहे. ईडीने एवढ्या तत्परतेने केलेल्या कारवाईबाबत मी समाधानी असल्याचे वक्फ बोर्डाच्या जमीन प्रकरणातील तक्रारदार मुश्ताक अहमद शेख यांनी म्हटले आहे.