काल दिवसभरात देशात 13 हजार 91 कोरोनाबाधितांची नोंद, तर 340 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा किंचितशी वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशात 13 हजार 91 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 340 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सलग 34 दिवसांपासून देशातील दैनंदिन बाधितांची संख्या ही 20 हजारांखाली, तर सलग 137 दिवसांपासून 50 हजारांखाली नोंदवल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. तर देशातील अॅक्टिवव्ह रुग्णसंख्या एक लाख 38 हजार 556 एवढी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन कोटी 44 लाक एक हजार 670 एवढी झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. तसेच देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 38 हजार 556 एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात देशात 340 बाधितांचा मृत्यू झाला असल्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या वाढून 4,62,189 झाली आहे.

देशातील दैनंदिन रुग्णसंख्या ही मागील 34 दिवसांपासून 20 हजारांखाली, तर सलग 137 दिवसांपासून 50 हजारांखाली नोंदवली गेली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 0.41 टक्के एवढी आहे. मार्च 2020 नंतर हा दर सर्वात कमी आहे. काल दिवसभरात देशात 13,878 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3,38,00,925 एवढी झाली आहे. देशाचा मृत्यूदर 1.34 टक्के एवढा आहे.

देशात कोरोनाविरोधात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 110 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात देशात 57 लाख 54 हजार 817 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशात 110 कोटी 23 लाख 34 हजार 225 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान देशाची चिंता केरळ राज्याने वाढवली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी जवळपास 60 टक्के बाधित एकट्या केरळ राज्यात आहेत. काल दिवसभरात केरळमध्ये सात हजार 540 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 48 बाधितांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. केरळमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 50,34,858 एवढी झाली आहे. तर मृताची संख्या 34,621 एवढी झाली आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्रातही किंचित वाढ पाहायला मिळाली. राज्यात काल दिवसभरात 1094 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1976 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 63 हजार 932 बाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे. राज्यात काल 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 12 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.