कोरोनाकाळात मागील दोन वर्षांत जगभरात झाली 80 लाख टन प्लॅस्टिक कचऱ्याची निर्मिती


नवी दिल्ली – जगभरात मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. याचदरम्यान जगभरात तब्बल 80 लाख टन प्लॅस्टिक कचरा निर्माण झाल्याचे वास्तव एका संशोधनात समोर आले आहे. तर यातील 25 हजार टनापेक्षा जास्त कचरा समुद्रात गेला आहे. कोरोनामुळे तयार झालेल्या प्लॅस्टिक कचऱ्यावरील संशोधन ‘प्रोसिडिंग्स ऑफ दी नॅशनल अकेडमी ऑफ सायंसेज’ यामध्ये प्रसारित करण्यात आले आहे. या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, प्लॅस्टिक कचऱ्याचा एक स्तर पुढील तीन ते चार वर्षांत लाटेंच्या माध्यमांतून समुद्र किनाऱ्यावर येण्याची शक्यता आहे. खुल्या समुद्रात या कचऱ्याचा काही भाग गेला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे हा कचरा आर्कटिक महासागरात एका ठिकाणी जमा होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांची संख्या वाढली होती. यात फेस मास्क, ग्लोज आणि फेस शील्ड यासारख्या एकदाच वापरत येणाऱ्या प्लॅस्टिकच्या साधनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळेच प्लॅस्टिकच्या कचऱ्यात वाढ झाली. नदी आणि समुद्रात हा कचरा गेला. जागतिक स्तरावर आधीपासून प्लॅस्टिकचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता, आता त्यात आणखी वाढ झाली आहे. चीनमधील नानजिंग विद्यापीठ आणि अमेरिकेमधील सॅन डिएगोतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांच्या नेतृत्वात जमीनीतून निघणाऱ्या प्लॅस्टिकवर महामारीचा प्रभाव मोजण्यासाठी एक नवीन प्लॅस्टिक संख्यात्मक मॉडेलचा उपयोग केला.

2020 मध्ये महामारीच्या सुरुवातीपासून ऑगस्ट 2021 पर्यंत प्लॅस्टिकचा अभ्यास या संख्यात्मक मॉडेलच्या आधारावर करण्यात आला. यामध्ये असे वास्तव समोर आले की, समुद्रात जाणारा सर्वाधिक प्लॅस्टिक कचरा आशियातून येतो. यातील सर्वाधिक कचरा रुग्णालयाचा असून वैद्यकीय कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन करण्याची विकसनशील देशात गरज असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

प्लॅस्टिक कचऱ्यांबाबत ज्यावेळी माहिती जमा करण्यास सुरुवात केल्यानंतर आश्चर्यचकित झालो. कारण, वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वैयक्तिक वापरला जाणाऱ्या कचऱ्यांपेक्षा जास्त होते. हा कचरा आशियातील देशातून सर्वाधिक येत असल्याचेही समोर आल्याचे संशोधन करणारे प्राध्यपाक आणि लेखक अमीना शार्टुप यांनी म्हटले आहे.

तब्बल 73 टक्के प्लॅस्टिक कचरा आशियातील नद्यांच्या माध्यमातून येत असल्याचे संशोधनात समोर आले आहे. यात अल-अरब, सिंधु आणि यांग्त्जी या तीन मोठ्या नद्यांचा मोठा वाटा आहे. अरबी समुद्रात आणि पूर्व चीन समुद्राला या नद्या मिळतात. 11 टक्के कचरा युरोपमधील नद्यांमधून समुद्रात जातो, असे संशोधनातून समोर आले आहे.