देशातील नागरिकांना बूस्टर डोसची आहे का? भारत बायोटेकचे संचालक म्हणतात…


नवी दिल्ली – कोरोना विरुद्ध अनेक देशांनी बूस्टर शॉट्ससह असुरक्षित लोकसंख्येचे लसीकरण सुरू केल्यानंतर, कोव्हॅक्सिन उत्पादक- भारत बायोटेकचे सीएमडी कृष्णा एला म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस घेणे योग्य ठरेल. पण याबाबतचा अंतिम निर्णय सरकारचा असल्याचेही ते म्हणाले.

यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, कृष्णा एला पुढे म्हणाले की आतापर्यंत, सरकार आणि काही तज्ञांचे मत आहे की बूस्टर डोस तातडीने गरजेचा नाही आणि दोन डोससह संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करणे हे प्राधान्य आहे. कोव्हॅक्सिनसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळण्यास विलंब होण्यामागे एला यांनी भारतातील लसी विरोधातील “नकारात्मक” दृष्टीकोनाला जबाबदार धरले. यामागे त्यांनी राजकारण असण्याची शक्यता बोलून दाखवली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी लसीच्या क्षमतेवर तसेच भारतीय विज्ञान आणि नवकल्पनेवर विश्वास ठेवून कोव्हॅक्सिन लस घेतली, त्यावेळी या लसीला भाजप लस किंवा मोदी लस असेही संबोधण्यात आले होते.

एला यांनी सूचित केले की भारत बायोटेकने विकसित केलेली नाकातील कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसच्या बदल्यात किंवा पूर्वी संक्रमित व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी घेतली जाऊ शकते. पुढे त्यांनी नमूद केले की वरच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नसलेल्या इंजेक्शनच्या लसीच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाकातील लस अधिक प्रभावी आहे.