सलमान खुर्शिद यांच्या नव्या पुस्तकात हिंदुत्वाची इसिस, बोको हरामशी तुलना


नवी दिल्ली – सध्या मोठा वाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या नव्या पुस्तकावरून निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पुस्तकाचे ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’, असे नाव असून सलमान खुर्शिद यांनी त्यामध्ये हिंदुत्वाची तुलना इसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपकडून त्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. भाजपकडून या पुस्तकातील संदंर्भावर टीका करताना, भगवा दहशतवादसारख्या कल्पना मुस्लिम मतांसाठी वापरणाऱ्या पक्षाच्या सदस्याकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते?’ असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.

सलमान खुर्शिद यांनी ही तुलना ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकातल्या ‘द सॅफ्रॉन स्काय’ या प्रकरणामध्ये केली आहे. गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व बाजूला सारले गेले आहे. हे आक्रमक हिंदुत्व इसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच असल्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. हा उल्लेख पुस्तकाच्या पान क्रमांक ११३ वर करण्यात आलेला आहे. सध्या या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला असून या पुस्तकावर आणि सलमान खुर्शिद यांच्यावर टीका केली जात आहे.


खुर्शिद यांच्यावर या मुद्द्यावरून भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. यासंदर्भात ट्वीट करून खुर्शिद यांना भाजप नेते अमित मालविय यांनी लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे सलमान खुर्शिद आपल्या नवीन पुस्तकात म्हणतात हिंदुत्व हे इसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांसारखे आहे. मुस्लिम मते मिळवण्याकरता ज्यांनी भगवा दहशतवाद नावाच्या कल्पनेचा वापर केला, अशा पक्षाच्या सदस्याकडून अजून काय अपेक्षा ठेवता येऊ शकते? असा सवाल मालवीय यांनी ट्विटमध्ये केला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये मालवीय यांनी वादात सापडलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ पुस्तकातल्या त्या उल्लेखाचा फोटो देखील ट्वीट केला आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये सलमान खुर्शिद यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दिल्लीस्थित वकील विवेक गर्ग यांनी दाखल केली आहे. दहशतवादाशी हिंदुत्वाची तुलना करून खुर्शिद यांनी हिंदुत्वाची प्रतिमा मलीन केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.