चंद्रपुर महानगरपालिकेने लसीकरण वाढावे यासाठी लढवली अनोखी शक्कल


चंद्रपुर – राज्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विरुद्ध अधिकाधिक लोकांना लसीकरण करवून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, राज्यातील चंद्रपूर महानगरपालिकेने लसीकरण बंपर लकी ड्रॉ जाहीर केला आहे. ज्यामध्ये एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटरपासून वॉशिंग मशीनपर्यंत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. १२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत जे नागरिक नागरी लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी येतात, त्यांना ही बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल, असे बुधवारी सायंकाळी महापालिकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

नागरिकांना बक्षिसे देण्याचा निर्णय महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर, आयुक्त राजेश मोहिते आणि इतर अधिकार्‍यांनी परिसरात फिरून लोकांना जवळच्या केंद्रात जाऊन लसीकरण करण्याचे आवाहन केले. लोक १२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान जे लस घेतील, ते लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यास पात्र असतील. या ड्रॉमध्ये फ्रिज, वॉशिंग मशिन आणि एलईडी टीव्ही अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षिसे आहेत. याशिवाय इतर १० नागरिकांना प्रोत्साहन म्हणून मिक्सर दिले जातील. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

आतापर्यंत चंद्रपूर शहरात १ लाख ९३ हजार ५८१ नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ९९ हजार ६२० जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. शहरातील एकूण पात्र व्यक्तींच्या तुलनेत लसीकरणाची संख्या अजूनही खूप कमी आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील २१ केंद्रांवर लसीकरण सुविधा उभारल्या असून सर्व पात्र लोकांनी लवकरात लवकर लसीकरण करावे, असे आवाहन महापौरांनी केला आहे.