मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट केल्याप्रकरणी नवाब मलिकांना अमृता फडणवीसांनी पाठवली नोटीस


मुंबई – नवाब मलिक यांनी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी केलेल्या अनेक खुलाश्यानंतर या प्रकरणाला आता वेगळेचे वळण लागले आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी लक्ष केले आहे. त्याचबरोबर ड्रग्ज क्षेत्रातील लोकांशी भाजपच्या अनेक नेत्यांचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच ट्विटवरुन मलिक यांनी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जयदीप राणाचा फोटो पोस्ट केला होता. जयदीप राणा ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. अमृता फडणवीसांवर नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे केलेल्या आरोपांनतर नवाब मलिकांना त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही केला होता. पण मलिक यांनी पत्रकार परिषदेआधी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला होता. याच फोटोबद्दल खुलासा करताना फोटोमधील व्यक्ती जयदीप राणा असून अमृता फडणवीस यांनी गायलेल्या मुंबईमधील नद्यांच्या संवर्धनासंदर्भातील गाण्याचा तो फायनान्स हेड होता, असा दावा मलिक यांनी केला. तसेच या गाण्याचा कथित ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी काय संबंध आहे, याबद्दलही नवाब मलिक यांनी माहिती दिली होती.

जयदीप राणाचे देवेंद्र फडणवीसांसोबत खास कनेक्शन असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. जेव्हा महाराष्ट्राचे फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा मुंबई नदी संरक्षणासाठी एक रिव्हर साँग तयार केले होते. ते गाणे सोनू निगम आणि अमृता यांनी गायले होते. देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार यांनीही अभियन केला होता, असे मलिक यांनी म्हटले होते.


अमृता फडणवीस यांनी त्यावरुन आता नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ४८ तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, असा इशारा अमृता फडणवीस यांनी मलिकांना दिला आहे.

यासंदर्भातील माहिती अमृता फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे. काही फोटोसह बदनामीकारक, दिशाभूल करणारी आणि अपमानास्पद ट्विटची मालिका नवाब मलिक यांनी शेअर केली आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली फौजदारी कारवाईसह बदनामीची नोटीस येथे आहे. एकतर बिनशर्त सार्वजनिक माफी मागून ४८ तासांत ट्विट हटवा किंवा कारवाईला सामोरे जा!, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. अमृता देवेंद्र फडणवीस एक भारतीय बँकर आहेत. गायक आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात त्यांना प्रचंड प्रतिष्ठा आहे. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची सार्वजनिकपणे प्रतिमा आपल्या बदनामीकारक ट्विटमुळे डागाळली असल्याचे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.