सात महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्री श्रबंतीचा पक्षाला रामराम


भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय बंगाली अभिनेत्री श्रबंती चॅटर्जीने गुरुवारी जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या वर्षी २ मार्च रोजी त्या भाजपमध्ये सामील झाल्या होत्या आणि त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती. बंगालच्या राजकारणात भाजपमध्ये पुढाकार घेण्याची क्षमता कमी असून प्रामाणिकपणाचा अभाव असल्याचे कारण श्रबंती चॅटर्जी यांनी पक्ष सोडताना दिले आहे.

ज्या पक्षाकडून मी राज्यातील विधानसभा निवडणुका लढवल्या त्या भाजपशी सर्व संबंध तोडून टाकले आहेत. त्याचे मुख्य कारण बंगालच्या राजकारणात भाजपमध्ये पुढाकार घेण्याची क्षमता कमी असून प्रामाणिकपणाचा अभाव असल्याचे श्रबंती चॅटर्जी यांनी ट्विट करून म्हटले. भाजपमधून त्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता त्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससोबत जातील का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तुमच्या मनात ममता दीदींसाठी सॉफ्ट कॉर्नर ठेवत आहे त्यामुळे तुम्ही टीएमसीमध्ये सामील होणार का, या प्रश्नाला उत्तर देताना, हे तर वेळच सांगेल…, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान श्रबंती चॅटर्जी यांच्या आधी बिस्वजित दास, तन्मय घोष, सौमेन रॉय या तीन आमदारांनी एका महिन्यात भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.