99 टक्के मुंबईकरांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस


मुंबई – 99 टक्के 18 वर्षांवरील मुंबईकरांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. याचा अर्थ असा की पहिल्या डोसपासून फक्त 1 टक्का मुंबईकर अद्याप वंचित आहेत. तर 63 टक्क्यांच्या घरात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या आहे. दीड कोटी मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुंबई महानगरामध्ये कोरोना प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी डोस देण्याची कामगिरी काल साध्य करण्यात आली. मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा यामध्ये समावेश आहे. काल सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत 92 लाख 4 हजार 950 (99 टक्के) नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 58 लाख 62 हजार 933 (63 टक्के) नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून संचालित होत असलेल्या कोविन संकेतस्थळावर नोंदविण्यात आलेली ही आकडेवारी आहे.

विशेष लसीकरण मोहिम मुंबई महानगरात वेगाने व अधिकाधिक नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यासाठी सुरु करण्यात आली. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून 4 मे पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण सुरु करण्यात आले. 26 मेपासून स्तनदा मातांसाठी तर 1 जूनपासून विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणाऱ्यांकरीता लसीकरण राबविण्यात येत आहे. 23 जून शारीरिक व मानसिकरित्या दुर्बल व्यक्तिंसाठी, 14 जुलैपासून गर्भवती स्त्रियांसाठी आणि शासकीय ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठी लसीकरण हाती घेण्यात आले. तर, 2 ऑगस्टपासून वैद्यकीय कारणांनी व वयोमानाने अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरण राबविण्यात येत आहे.

त्याचबरोबर राखीव विशेष लसीकरण सत्र दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, एलजीबीटी समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी, शिक्षक आणि 18 वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. समाजातील कोणताही घटक लसीकरणातून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेत आहे.

शासनाने जनगणनेच्या सांख्यिकी आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेता, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 92 लाख 36 हजार 500 पात्र नागरिकांचे कोरोना लसीकरण (दोन्ही मात्रा मिळून) करायचे आहे.