१०० वर्षापूर्वी चोरीला गेलेली अन्नपूर्णा मूर्ती कॅनडाने केली परत

मोदी सरकारकडून सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून १०० वर्षापूर्वी वाराणसी येथून चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती कॅनडाने भारताला परत केली आहे. ११ नोव्हेंबर, गुरुवारी ही प्राचीन मूर्ती उत्तर प्रदेश सरकारला सोपविली जात आहे. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी विधिवत प्रतिष्ठापना करून योगी आदित्यनाथ ही मूर्ती काशी विश्वेश्वर मंदिरात स्थापन करणार आहेत. या अन्नपूर्णा देवीच्या एका हातात खिरीची वाटी आणि दुसऱ्या हातात डाव आहे.

१८ व्या शतकात बनविलेली ही मूर्ती १९१३ मध्ये काशीतील एका घाटावरून चोरी झाली होती आणि ती कॅनडा मध्ये गेली होती. तेथे मॅकेंझी कलादालनात रेहीना विश्वविद्यालयाच्या संग्रहालयाचा ती एक भाग होती. नॉर्मन मॅकेंझी यांनी या मूर्तीबाबत इच्छापत्र केले होते. १९३६ मध्ये कलादालनाच्या संग्राहालयात ही बाब उघड झाली होती. या वर्षी कलादालनाच्या आगामी प्रदर्शनाची तयारी सुरु असताना कलाकार दिव्या मेहरा यांच्या नजरेस ही मूर्ती पडली तेव्हा त्यांनी भारत सरकारच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर सरकारने ही प्राचीन मूर्ती परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर विश्वविद्यालयाचे कुलपती थोमस चेस यांनी भारतीय उच्चायुक्त अजय बिसारीया यांच्या कडे ही मूर्ती सोपविली.

या मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी १८ जिल्ह्यातून तिची मिरवणूक काढली जाणार असून १४ नोव्हेंबर रोजी ही मूर्ती वाराणसीला पोहोचणार आहे. आणि १५ नोव्हेंबर ला देवोत्थान एकादशी दिवशी तिची स्थापना केली जाणार आहे.