शेरलॉक होम्सच्या ११९ वर्षापूर्वीच्या कादंबरीतील पानाला ३.३ कोटींची किंमत
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका लिलावात प्रसिद्ध गुप्तहेर शेरलॉक होम्स याच्या कादंबरीतील एका पानाचा लिलाव झाला असून या पानाला ४२३,००० डॉलर्स म्हणजे ३.३ कोटी इतकी प्रचंड किंमत मिळाली. लेखक आर्थर कानन डॉयलने ११९ वर्षापूर्वी म्हणजे १९०२ मध्ये शेरलॉक होम्सला पुनर्जीवित करताना ‘द हाउंड ऑफ बास्करव्हिले’ ही कादंबरी लिहिली होती. त्यातील हे पान असून ते डॉयलच्या हस्तलिखित आहे.
२० बाय ३३ आकाराच्या या पानात होम्स आणि डॉ.वॉटसन मूर हत्येबाबत संशयिताच्या अटकेची चर्चा करतात असा मजकूर असून यातील एक ओळ डॉयल याने स्क्रिप्ट मध्ये सुधारणा करण्यासाठी खोडलेली आहे. या कादंबरीची ३७ पानेच आता शिल्लक आहेत. त्यातील हे एक पान डलास मध्ये एका हेरीटेज लिलावात एका खासगी ग्राहकाला विकले गेले होते असे समजते. त्याचाच पुन्हा लिलाव झाला आहे. डॉयलने १८९४ मध्ये शेरलॉक होम्सचा मृत्यू झाल्याचे कथानक लिहून अखेरची कादंबरी लिहिली होती. पण त्यानंतर वाचकांनी त्याला शेरलॉक होम्सला परत आणा असा इतका तगादा लावला कि अखेर त्याला १९०२ मध्ये नवी कादंबरी लिहून होम्सला पुनर्जीवन द्यावे लागले होते.