विंडोज ओएस झाली ३८ वर्षांची
आजच्या काळात संगणकाशिवाय आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही आणि विंडोज ओएस खेरीज संगणकाची कल्पना करता येणार नाही. १० नोव्हेंबर १९८३ म्हणजे ३८ वर्षापूर्वी झालेल्या या क्रांतीने जग बदलविले. बिल गेट्स व मायक्रोसॉफ्ट यांनी पहिली युजर फ्रेंडली ऑपरेटिंग सिस्टीम बनविली. तिचे नाव होते विंडोज १.० आज अशी परिस्थिती आहे कि या ओएस शिवाय जगात कुठलाच डेस्कटॉप संगणक काम करू शकत नाही. विंडोजचा हा क्रांतिकारी प्रवास मोठा रोचक आहे.
मायक्रोसॉफ्टचे प्रेसिडेंट आणि बोर्ड चेअरमन बिल गेट्स यांनी न्यूयॉर्क सिटी मध्ये एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे आकर्षण होते एक ऑपरेटिंग सिस्टीम. सहज व सुलभ ग्राफिक युजर इंटरफेसवाले. त्यावेळच्या या ओएसला अगदी मोजके फीचर्स होते जे ऐकून आजच्या पिढीचा विश्वास त्यावर बसणार नाही. त्यात ड्रॉप डाऊन मेनू, टिल्ड विंडोज होत्या आणि माउस च्या सहाय्याने बरीच कामे करता येत असत. हि सिस्टीम कुठेही सहज ऑपरेट करता येत असे. बिल गेट्सना या सिस्टीमला न्यू ग्राफिक ऑपरेटिंग सिस्टीम इंटरफेस मॅनेजर असे नाव द्यायचे होते.
पण मायक्रोसॉफ्टचे मार्केटिंग प्रमुख लुविकी हॅनसन यांनी विंडोज हे नाव सुचविले. आज ३८ वर्षात विंडोजची ११ व्हर्जन आली असून हा दीर्घ प्रवास यशदायी ठरला आहे. १९८० मधले संगणक २५९ केबी रॅम, १ ग्राफिक अॅडॉप्टर. दोन फ्लोपी ड्राईव्ह व हार्ड ड्राईव्ह याच्यावर चालत असत. त्यावेळी विंडोज १.० ची किंमत ९९ डॉलर्स म्हणजे ७५०० रुपये होती आणि त्या काळाच्या मानाने ती खूप जास्त होती.
पण त्यावेळी संगणक हे सुद्धा महागडे उपकरण होते आणि त्याच्या किंमती लाखात होत्या. त्यातुलनेत विंडोजची हि किंमत परवडणारी होती. आज विंडोज १० आणि ११ चलनात आहेत.