‘द अमेरिकन ड्रीम लिमोसिन’चा जलवा पुन्हा दिसणार

जगातील सर्वाधिक लांबीची लिमोसिन ‘ द अमेरिकन ड्रीम’ चे नुतनीकरण सुरु झाले असून पुन्हा एकदा ही लिमोसिन तिचा जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे. १९८६ मध्ये या लिमोसिनची नोंद सर्वाधिक लांबीची कार म्हणून गिनीज बुक मध्ये केली गेली आहे. १०० फुट लांबीची ही अलिशान कार ९० च्या दशकात डिझाईन केली गेली आहे. जे.आर ओरबर्ग यांनी ही कार डिझाईन केली असून ते स्वतः कार संग्राहक होते. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या कार्स ते खरेदी करत असत.

द अमेरिकन ड्रीमला २६ चाके असून ही जगावेगळी कार दोन्ही बाजूनी चालविता येते. १९८० मध्ये ओरबर्ग यांनी तिचे डिझाईन केले मात्र तिला प्रत्यक्षात यायला १९९२ साल उजाडावे लागले. या कारला दोन व्ही आठ इंजिन दिली गेली असून त्यातील एक पुढच्या भागात तर एक मागच्या भागात आहे. कार मध्ये स्विमिंग पूल, जाकुझी, बाथटब, छोटे गोल्फ कोर्स आणि हेलिपॅड आहे. एकावेळी त्या कार मधून ७० लोक प्रवास करू शकतात.

प्रवाशांसाठी काही टीव्ही, फ्रीज, टेलिफोन सुविधा आहे. या कारचा खासगी वापर करायचा असेल तर ताशी ५० ते २०० डॉलर्स भाडे आकारले जात असे. मात्र या कारची देखभाल हे अवघड आणि खर्चिक प्रकरण बनले होते. २०१२ नंतर हि लिमोसिन केवळ नावापुरती उरली होती. तिची चाके आणि खिडक्या सुद्धा चोरट्यांनी काढून नेल्या होत्या. या अमेरिकन ड्रीमचे जुने वैभव परत आणण्यासाठी संग्रहालयाला काम करायचे होते पण ते शक्य झाले नव्हते. अखेर न्यूयॉर्क तंत्रशिक्षण संग्रहालयाने तिचा पुनरुद्धार करायचा विडा उचलला. पण त्यातही करोनाचा अडथळा आल्याने काम लांबले. आता मात्र हे काम पूर्ण झाले असून ‘द अमेरिकन ड्रीम’ पुन्हा रस्त्यावर आपला जलवा दाखविण्यास सिद्ध झाली आहे.