कंगना पडली प्रेमात?
बॉलीवूड अभिनेत्री आणि वादविवादांची राणी कंगना राणावत हिला मनकर्णिका आणि पंगा या चित्रपटातील कामगिरी बद्दल नुकताच पद्मश्री सन्मान देऊन गौरविले गेले असतानाच कंगना पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे संकेत मिळाले आहेत. टाईम्स नाऊ समिट २०२१ मध्ये मुलाखतीत स्वतः कंगनाने हे संकेत दिले आहेत. तू पुढच्या पाच वर्षात स्वतःला कुठल्या भूमिकेत पाहतेस असा प्रश्न विचारला गेल्यावर कंगनाने एक पत्नी आणि आईच्या रुपात मी मला पाहते असे उत्तर दिले आहे. त्यावर तुझे अफेअर सुरु आहे का असा प्रश्न आल्यावर कंगनाने लवकरच त्याबद्दल कळेल असे उत्तर दिले असून त्यातून तिला मिस्टर परफेक्ट मिळाला आहे असा अर्थ काढला गेला आहे.
मध्यंतरी कंगना राजकारणात येणार याची मोठी चर्चा होती. पण कंगनाने मात्र आहे तेच प्रोफेशन तिला आवडते असे सांगितले. या प्रोफेशन मध्ये पैसा आहे, चांगले कपडे घालायला मिळतात, अफेअर्स करता येतात, थोडक्यात जे हवे ते करता येते असेही सांगितले. मध्यमवर्गीय परिवारातून आणि छोट्याश्या गावातून आल्यावर आपली कशी टिंगल होत होती याचे किस्से सुद्धा तिने सांगितले. कंगना सांगते तिला इंग्रजी येत नव्हते तेव्हा तिची खूप टिंगल केली गेली पण अनेक जण छाती पुढे काढून त्यांना इंग्रजी येत नाही हे अभिमानाने सांगतात. काळ बदलला आहे असे सांगून कंगना म्हणते कलाकार म्हणून खूप प्रेम, सन्मान, पारितोषिके मिळाली. पण एक आदर्श नागरिक म्हणून मिळालेला पद्मश्री सन्मान आयुष्यात प्रथमच मिळाला त्याचा आनंद मोठा आहे.