नवाब मलिकांच्या विरोधात वानखेडेंच्या मेहुणीची पोलिसांत तक्रार


मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेवर आणखी एक आरोप केला होता. समीर वानखेडे यांना त्यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यापारात गुंतलेली होती का, असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता. यासोबत कथित पुरावेही मलिक यांनी शेअर केले होते. त्यानंतर आता हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी नवाब मलिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मंगळवारी गोरेगाव पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४ड, ५०३ आणि ५०६ आणि महिलांसोबत असभ्य प्रतिनिधित्व कायदा, १९८६ च्या कलम चार अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

माझे नाव सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून घेतले जात आहे आणि असा दावा केला जात आहे की मला २०१८ मध्ये तस्करी आणि ड्रग्जचा कथित ताबा या गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली आहे. हे पाहून मला धक्का बसला असल्याचे हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी म्हटले आहे. नवाब मलिक आणि अज्ञात इतरांनी एमव्ही कॉर्डेलिया क्रूझ केसमधील आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींविरुद्धचा खटला कमकूवत करण्यासाठी या प्रकरणातील माझ्या बहिणीच्या पतीला गुन्हेगारी रितीने धमकावण्यासाठी हे केले असल्याचे हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.