एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन होऊ शकते विराट कोहलीची हकालपट्टी


मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेमधील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. नुकतीच न्यूझीलंड विरोधातील टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 प्रकारातील कर्णधारपद विराट कोहलीने सोडल्यामुळे त्याच्या जागी रोहितची निवड होणार हे निश्चित मानले जात होते. त्यानंतर मंगळवारी ही औपचारिकता पूर्ण करण्यात आली.

त्यानंतर आता लवकरच विराटला बीसीसीआय आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयने अद्याप एकदिवसीय संघाच्या कर्णधाराबद्दल काहीही सांगितलेले नाही. पण, भारतामध्ये 2023 साली होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी टी-20 आणि एकदिवसीय संघाचा एकच कर्णधार असावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे. त्यामुळे योग्यवेळी विराटला या एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून हटवून रोहित शर्माला कर्णधार करण्याची तयारी सुरू झाली आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआय विराट कोहलीलाच कर्णधार म्हणून कायम ठेवेल याची मला खात्री नाही. याची शक्यता खूपच कमी आहे. विराट फक्त टेस्ट संघाचा कर्णधार असेल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

आगामी काळात आयसीसीच्या 2 स्पर्धा आहेत. पुढच्या वर्षी पुन्हा ऑस्ट्रेलियात एक टी-20 विश्वचषक स्पर्धा होईल. त्यानंतर 2023 साली भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धांसाठी संघाची बांधणी करण्यासाठी रोहितला वेळ मिळावा, यासाठी त्याला लवकरात लवकर कर्णधार करण्यात येणार आहे.