‘या’ संघाची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पात्रता फेरीतून माघार


आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२२साठी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरीचे सामने सुरु आहेत. पापुआ न्यू गिनी संघाने या पात्रता फेरीसाठी आपला संघ पाठवण्यास असमर्थता दर्शवली आहे. कोरोनाची लागण महिला क्रिकेट संघातील काही जणांना झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ६ नोव्हेंबरला पापुआ न्यू गिनीचा संघ झिम्बाब्वेला जाण्यापूर्वी क्वारंटाइन होता. या दरम्यान काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच पर्यायी खेळाडू नसल्यामुळे पापुआ न्यू गिनी बोर्डाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कैया अरुआच्या नेतृत्वाखालील संघ विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज, नेदरलँड, आयर्लंड आणि श्रीलंकेसोबत खेळणार होता.

विश्वचषक स्पर्धा पात्रता फेरीसाठी पापुआ न्यू संघ येणार नसल्याचे आम्हाला दु:ख होत आहे. कोरोनाची लागण संघातील अनेकांना झाल्यामुळे आमच्या समोर पर्याय नाही. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही कोरोना नियम पाळत पुढे जाऊ. आम्हाला पापुआ न्यू गिनी संघाबद्दल वाईट वाटते. या स्पर्धेसाठी त्यांनी जोरदार तयारी केली होती. आम्हाला आशा आहे की, लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतील आणि एक संघ म्हणून नावलौकिक मिळवतील, असे आयसीसी आयोजक प्रमुख ख्रिस टेटली यांनी सांगितले.

झिम्बाब्वेमध्ये आयोजित पात्रता फेरीचे सामने महत्त्वाचे आहेत. न्यूझीलंडमध्ये पुढच्या वर्षी ४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे पात्रता फेरीतून तीन महिला संघांची निवड होणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघाची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.