‘नायका’च्या संस्थापिका ठरल्या ‘हा’ पराक्रम करणाऱ्या पहिल्याच भारतीय महिला


मुंबई – भारतामधील सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय सौंदर्यप्रसाधने निर्मिती क्षेत्रातील कंपनी असणाऱ्या ‘नायका’च्या मालकीण फाल्गुनी नायर यांनी आज एक अनोखा पराक्रम केला आहे. श्रीमंतांच्या यादीमध्ये ‘नायका’ची अर्धी मालकी असणाऱ्या फाल्गुनी यांचा समावेश झाला असून कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी तब्बल ८९ टक्क्यांनी वाढ पहायला मिळाली. फाल्गुनी यांची एकूण संपत्ती याच शेअर बाजारामधील भरभराटीमुळे ६.५ बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी झाली आहे. फाल्गुनी यांनी स्वत:च्या जोरावर सर्वाधिक श्रीमंत महिला होण्याचा मान यामुळे मिळवल्याचे ब्लुमबर्ग बिलेनिर्यस इंडेक्सने म्हटले आहे.

एफएसएन ई कॉर्मर्स व्हेंचर्स ही महिला नेतृत्व करत असणारी भारतातील पहिली अशी कंपनी ठरली, जी स्टॉक मार्केटमध्ये दाखल झाली आहे. नुकतीच कंपनीच्या शेअर्सची विक्री करण्यात आली, ज्यामधून ५३.५ बिलियन रुपये म्हणजेच ७२२ मिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी उभा करण्यात आला आहे. या शेअर्सची किंमत मुंबईमध्ये सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनी तब्बल ७८ टक्क्यांनी वधारलेली पहायला मिळाली.

‘नायका’ कंपनीची स्थापना फाल्गुनी यांनी वयाची ५० ओलांडण्याच्या काही महिने आधी म्हणजेच २०१२ च्या पहिल्या काही महिन्यांमध्येच केली. ‘नायिका’ या संस्कृत शब्दापासून महिलांसाठी प्रोडक्ट विकणाऱ्या या कंपनीचे नाव ठेवण्यात आलेले आहे. यापूर्वी इनव्हेसमेंट बॅकिंगमध्ये फाल्गुनी होत्या. बाजारमध्ये ‘नायका’ येण्याआधी भारतामधील महिला या जवळच्या दुकानांमध्ये किंवा मॉलमध्येच ब्युटी प्रोडक्टची शॉपिंग करायच्या. पण आता ‘नायका’ने थेट घरापर्यंत हे प्रोडक्ट आणून देण्यास सुरुवात केली.

‘नायका’ला सेलिब्रिटी आणि इतर माध्यमातून केलेल्या जाहिरातींचा फायदा झाला. ‘नायका’वर अगदी लिपस्टीक्सपासून ब्रायडल मेकअप, नेलपॉलिश, फाऊण्डेशन अशा मेकअप संदर्भातील सर्वच वस्तू उपलब्ध आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीची उलाढाल ३५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. या कंपनीला आणि या प्लॅटफॉर्मला सध्याच्या ऑनलाइन जमान्यामध्ये चांगली मागणी असल्यामुळे शेअर्सलाही चांगली किंमत मिळाली आहे.

दोन कुटुंबाच्या नावे असणारे ट्रस्ट आणि सात इतर प्रमोटर्सकडे कंपनीची मालकी आहे. यामधील प्रमोटर्समध्ये फाल्गुनी यांचा मुलगा आणि मुलीचाही समावेश आहे.