समीर वानखेडेंचे नवाब मलिकांच्या बनावट चलन जप्तीच्या आरोपाला प्रत्त्युत्तर


मुंबई – महाराष्ट्राचे अल्पसंख्या मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी बुधवारी खंडन केले आहे. बीकेसीमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑक्टोबर २०१७ रोजी छापा टाकत १४ कोटी ५६ लाख रुपयांचे बनावट चलन जप्त केले होते. हे प्रकरण त्यावेळी समीर वानखेडेंकडे होते. देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबण्यासाठी समीर वानखेडेंची मदत घेतली होती. तसेच नवाब मलिक यांनी हाजी अरफातच्या भावाचे प्रकरण मिटवले, असा आरोप केला आहे. आता समीर वानखेडे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.

१४ कोटी ५६ लाख रुपयांच्या जप्तीला आठ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले. काही दिवसांनी आरोपीला जामीन मिळाला. एनआयएकडे हे प्रकरण सोपवण्यात आले नाही, असे आरोप नवाब मलिकांनी केले होते. समीर वानखेंडेंनी त्यावर हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. मीड डेच्या वृत्तानुसार, २०१७ मध्ये जप्त केलेल्या बनावट नोटांचे दर्शनी मूल्य सुमारे १४ कोटी नव्हे तर सुमारे १० लाख होते आणि या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली होती. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हे प्रकरण ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) संपर्क साधला होता, पण त्यांनी तसे केले नाही, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांचे आरोप निराधार असून २०१७ मध्ये जप्त केलेल्या बनावट नोटांचे दर्शनी मूल्य सुमारे १४ कोटी नव्हे तर १० लाख एवढे होते. तीन जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. डीआरआयने त्यावेळी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयएकडे संपर्क साधला होता, पण हे प्रकरण एनआयएने ताब्यात घेतले नाही, असे वानखेडे म्हणाले. नोटाबंदीनंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राज्यात बनावट नोटांचा खेळ सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केल्यानंतर लगेचच त्याचे पडसाद उमटले.