वाशी चेकनाक्याजवळ सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत येण्यापूर्वीच अडवले


मुंबई – अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना राज्यात मागील काही दिवसांपासून घडल्या आहेत. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. सरकारकडून वेळोवेळी हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन केले जात आहे. पण, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात याचा फटका बसला आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसह मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी सदाभाऊ खोत मुंबईत आले होते. पण, मोर्चेकऱ्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांना वाशी चेकनाक्याजवळ अडवण्यात आले आहे. राज्य सरकारने हे आंदोलन चिघळवण्याचे काम केले आहे. एसटी कर्मचारी शांततेच्या मार्गाने आझाद मैदानावर येतील, मंत्रालयालयाऐवजी आझाद मैदानात येण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यांच्या आवाहनाला आम्ही संमती दिली होती. पंरतु आम्हाला त्यापूर्वीच अडवण्यात आले आहे. राज्यभरातून जवळपास ५० हजार एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. पण, सर्वांनाच कुठेना कुठे पोलीस बॅरिकेड्स लावून अडवत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काची ही लढाई आहे. आपण त्यांना त्यांचा हक्क मागण्यापासून थांबवू शकत नसल्याचे सदाभाऊ खोत एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. या बैठकीत पोलिसांच्या बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढायचे असे ठरल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. ड्रग्ज प्रकरणावरून रोज पत्रकार परिषद घेऊन तुम्ही ड्रग्ज माफियांना वाचवण्यासाठी टाहो फोडता. पण, ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून देखील तुम्ही या विषयावर बोलायला तयार नसल्यामुळे एसटी जोपर्यंत मला मुंबईत जाऊ देणार नाही, तोपर्यंत येथेच अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.