न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा संघाचा कर्णधार


नवी दिल्ली – सलामीवीर फलंदाज रोहित शर्माकडे विराट कोहलीच्या जागी मंगळवारी टीम इंडियाच्या टी-20 संघाचे कर्णधारपद अधिकृतरीत्या सोपवण्यात आले. १७ नोव्हेंबरपासून जयपूर येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

रोहितच्या कर्णधारपदाच्या औपचारिकतेसह के. एल. राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा ऋतुराज गायकवाड आणि सर्वाधिक बळी मिळवणारा हर्षल पटेल यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले. ऋतुराजने श्रीलंकेत झालेल्या मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याला वगळून अष्टपैलू वेंकटेश अय्यरला संधी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत तंदुरुस्तीच्या कारणास्तव हार्दिक अपयशी ठरला होता. संघात अनुभवी लेग-स्पिनर यजुर्वेंद्र चहलचे पुनरागमन झाले आहे. याचप्रमाणे मोहम्मद सिराजलाही बऱ्याच कालावधीनंतर टी-20 संघात स्थान दिले आहे. टी-20 विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून संयुक्त अरब अमिरातीला गेलेल्या श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी मुख्य संघात घेण्यात आले आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी आणि फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

भारताचा टी-20 संघ – रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, यजुर्वेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्शल पटेल, मोहम्मद सिराज.