रेल्वेमंत्र्यांनी केली कोरोना काळात वाढलेले भाडे कमी करण्यासंदर्भातील घोषणा


नवी दिल्ली: लवकरच ट्रेनवरून स्पेशल टॅग हटवण्याची आणि वाढलेले भाडे कमी करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी ओडिशामधील झारसुगुडा दौऱ्यावर असताना सांगितले की कोरोनाचे संकट कमी होत असतानाच आता रेल्वे गाड्यांची वाहतुकदेखील सुरळीत होते आहे. पुढील दोन-अडीच महिन्यात ट्रेनवरून स्पेशल टॅग काढला जाईल. त्याचबरोबर प्रवाशांना कोरोना संकटाआधीच्या व्यवस्थेनुसार कमी भाडे द्यावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विशेष श्रेणीच्या प्रवाशांसाठी आधीप्रमाणेच रेल्वेभाड्यात सवलत दिली जाणार आहे. रेल्वे मंत्रालय परिस्थितीवर नजर ठेवून असून दक्षिण-पूर्व रेल्वे आणि पूर्व किनाऱ्यावरील रेल्वे अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर रेल्वे मंत्र्यांनी ही घोषणा केली.

यावेळी रेल्वेमंत्र्यांनी म्हटले की तीन रेल्वे विभागात विभागले गेलेल्या झारसुगुडाला वेगळे डिव्हिजन देण्यासाठीच्या मागणीचा किंवा याला पूर्व किनाऱ्यावरील विभागात समाविष्ट करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होते आहे. यावर रेल्वे मंत्रालय विचार करते आहे. रेल्वे मंत्री पुढे म्हणाले की रेल्वेचे जे पूर्वोद्यचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे त्यात ओडिशाचे स्थान प्रमुख आहे. येथील समस्या एक-एक करत सोडवल्या जात आहेत.

दरम्यान झारसुगुडा स्टेशनवरील एका स्टॉलवर रेल्वे मंत्र्यांनी चहाचा आनंद घेतला. याचा व्हिडिओदेखील रेल्वे मंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट शेअर केला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की २५,००० पेक्षा जास्त पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकिटांची देखील विक्री होते आहे. यामध्ये लोक रस घेत आहेत. याची कक्षा आणखी वाढवण्यात येईल. त्यांनी पुढे म्हटले की पोस्टाचे भवितव्य उज्ज्वल आहे. स्पीड पोस्ट आणि पार्सल सिस्टम लोकांना आवडते आहे. अनेक नव्या योजनांद्वारे पोस्ट विभागात सुधारणा केल्या जात आहेत. रेल्वे मंत्रालयाबरोबरच अश्विनी वैष्णव हे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचेही मंत्री आहे.

रेल्वे विभागाने कोरोना महामारीच्या संकटकाळात परिस्थितीनुरुप आपल्या कामकाजात बदल केले होते. या काळात प्रवाशांसाठी खास ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. अर्थात या परिस्थितीत रेल्वेने भाडेवाढ केली होती, त्याचबरोबर इतर सवलती कमी केल्या होत्या. पण रेल्वे आता पुन्हा पुर्वपदावर येत आहे आणि आधीप्रमाणेच रेल्वेभाडे आणि सवलती सुरू करण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वेचे महत्त्व मोठे आहे.