कुख्यात गुन्हेगारांना देवेंद्र फडणवीसांनी सरकारी पदांवर बसवले; नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप


मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेतली, याबाबत केलेले आरोप बिनबुडाचे असून, गुन्हेगारी जगताशी फडणवीस यांचे असलेल्या संबंधांचा स्फोट करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

माझ्यावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप लावले, त्याचा खुलासा मी केला. मी मंत्री असताना सलीम पटेलबाबत तुम्हाला माहिती नव्हती का? असे देवेंद्र फडणवीसांनी विचारले होते. मी २००५ मध्ये मंत्रीपदावर नव्हतो. आम्ही संपत्ती खरेदी केल्यानंतर सलीम पटेलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मला पाच महिन्यांपूर्वी माहिती मिळाली की त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी शाहवली खानसोबत व्यवहार केल्याचे म्हटले. तो २००५ मध्ये आरोपी नव्हता. तेथील जागेच्या वॉचमनचा तो मुलगा होता आणि त्याने त्या जागेच्या कागदपत्रांवर त्याचे नाव लावले होते. आम्ही ते काढण्यासाठी त्याला पैसे दिले, हे सत्य असल्याचे नवाब मलिकांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस एनसीबीमध्ये सुरु असलेल्या वसुलीच्या लढाईला दुसरीकडे वळवण्याचे काम करत आहेत. त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत. कारण त्या अधिकाऱ्याचे आणि फडणवीसांचे जुने संबंध आहेत. २००८ मध्ये आलेला अधिकारी १४ वर्षे मुंबईतच आहे, यामध्ये काय कारण आहे. दुसऱ्यांवर देवेंद्र फडणवीस आरोप करतात की अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत. तुम्ही मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या लोकांना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले? मुन्ना यादव नावाचा एक कुख्यात गुंड ज्याच्यावर हत्येपासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि तो तुमचा राजकीय साथीदार आहे. त्या मुन्ना यादवला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष बनवले होते की नाही.

हैदर आजम नावाच्या एका नेत्याला तुम्ही मौलाना आझाद फायन्सान कॉर्पोरेशनचा अध्यक्ष बनवले होते की नाही. बांग्लादेशातील लोकांना मुंबईत आणण्याचे काम हैदर आजम नाही करत का? हैदर आजमची दुसरी पत्नी जी बांग्लादेशी आहे, ज्याची चौकशी मालाड पोलिसांनी केली होती. जेव्हा पोलीस तपास करत होते तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून ते प्रकरण दाबण्याचे काम तुम्ही केले होते की नाही. संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या इशाऱ्यावर वसुलीची कामे होत होती की नाही. मुंबईच्या बिल्डरांच्या जागेचे भांडणवरुन पोलिसांत तक्रार करुन वसुली केली जात होती की नाही. जमिनींच्या मालकांना पकडून आणून त्या जागा आपल्या नावावर केल्या जात होत्या की नाही. तुमच्या कार्यकाळात परदेशातू कुख्यात गुंड फोन करायचे, असे मलिक म्हणाले.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी झाली, तेव्हा देशभरात बनावट नोट्या पकडल्या जाऊ लागल्या. पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात खोट्या नोटांचे एकही प्रकरण समोर आले नाही. कारण बनावट नोटांचा खेळ महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या प्रोटेक्शनमध्ये सुरु होता. बीकेसीमध्ये ८ ऑक्टोबर २०१७ रोजी गुप्तचर महसूल विभागाने छापा टाकला, त्यात १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या बनावट नोट्या सापडल्या. देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी मदत केली. बनावट नोटांच्या या नेक्सकमध्ये आयएसआय पाकिस्तानकडून बांग्लादेशमार्गे संपूर्ण भारतात पसरवल्या जातात. मुंबई आणि पुण्यात या प्रकरणी दोघांना अटक झाली. पुण्यात इम्रान आलम शेख याला अटक करण्यात आली. पण १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या जप्तीला आठ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले. आरोपीला काही दिवसांनी जामीन मिळाला. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले नाही, असे नवाब मलिक म्हणाले.

या नोटा कुठून आल्या याची चौकशी केली गेली नाही. कारण हे रॅकेट चालवण्याऱ्या लोकांना तत्कालीन सरकारचे संरक्षण होते. काँग्रेसचा नेता तो असल्याचे सांगण्यात आले. हाजी अरफात शेखचा इम्रान आलम शेख हा लहान भाऊ आहे. देवेंद्र फडणवीसांनी इम्रान आलम शेखला भाजपमध्ये आणून अल्पसंख्यांक आयोगाचा अध्यक्ष बनवले होते. देवेंद्र फडणवीस तुम्ही कुख्यात गुंड मुन्ना यादवला अध्यक्ष बनवता, बांग्लादेशातील लोकांना मुंबईत स्थायिक करण्याचे काम करणाऱ्याला तुम्ही अल्पसंख्यांक मौलाना आझाद फायन्सान कॉर्पोरेशनचा अध्यक्ष बनवता. तुम्ही पूर्णपणे राजकारणात गुन्हेगारांचा वापर केला. रियाज भाटी कोण आहे, ते देवेंद्र फडणवीसांनी सांगावे, असा सवाल नवाब मलिकांनी केला.

सहार एअरपोर्टवर २९ ऑक्टोबर रोजी खोट्या पासपोर्टसह पकडला गेला. अंडरवर्ल्डसोबत ज्याचे संबंध होते. तुमच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात रियाज भाटी वारंवार का दिसत होता. रियाज भाटीने पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतही फोटो काढले. असे काय कारण होते की रियाज भाटी पंतप्रधानांतपर्यत पोहोचला. गुन्हेगारांना देवेंद्र फडणवीस तुम्ही सरकारी पदांवर बसवले, खोट्या नोटांचे नेक्सस तुम्ही चालवले. रियाज भाटीच्या माध्यमातून वसुली केली केली. आज तर एवढेच सांगत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळी कृत्ये लोकांच्या समोर मी ठेवणार असल्याचे मलिक म्हणाले.