नवाब मलिकांच्या मुलीने ‘बिगडे नवाब’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना दिले उत्तर


मुंबई – राज्यातील अमली पदार्थ कारवाई प्रकरणाला देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे वेगळेच वळण लागले आहे. ड्रग्ज क्षेत्रातील लोकांशी भाजपच्या अनेक नेत्यांचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे देवेंद्र फडणवीस हे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिकांनी केला होता. तसेच ट्विटवरुन मलिक यांनी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जयदीप राणाचा फोटो पोस्ट केला होता. मलिक यांनी जयदीप राणा ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा केला आहे. दरम्यान याप्रकरणी आता फडणवीस आणि नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडूनदेखील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

नवाब मलिक यांच्या टीकेला अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत कवितेतून उत्तर दिले होते. त्यानंतर आता नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक खानने अमृता फडणवीस यांना उत्तर दिले आहे. जर काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील असा इशाराच त्यांनी दिला आहे. बिघडलेल्या नवाबांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद घेतल्या. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा असल्याचे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे.


दरम्यान निलोफर यांनी अमृता फडणवीसांच्या ट्विटला जर आपल्याकडे लपवण्यासारखे काही नसेल, तर त्यांना पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये. जेव्हा सत्य तुमच्या बाजूने असते, तेव्हा तिथे भीती नसते. जर तुमचे काही वाईट हेतू असतील, तर ते उघड केले जातील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच एकमेव आमचा अजेंडा असल्याचे उत्तर दिले आहे.