देवेंद्र फडणवीसांना मलिकांच्या आरोपांवर हसू आवरेना


मुंबई – आजच्या पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर फडणवीस यांनी माध्यमांशी बोलाताना अगदी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली. मला असे वाटते माझे ट्विट पुरेसे बोलके आहे आणि आशिष शेलार यांची प्रतिक्रिया देखील पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा त्याला काही जास्त वजनही नसल्यामुळे त्याला उगाच कशाला वजन द्यायचे, असे फडणवीस म्हणाले. तसेच त्यांना यावेळी हसू आवरत नसल्याचेही दिसून आले.

तसेच, फडणवीस यांनी यावेळी राज्यातील एसटी कामगारांच्या सुरू असलेल्या संपावरून महाविकास आघाडी सरकारवर यावेळी निशाणा देखील साधला. सरकारची एसटी महामंडळाच्या संपाच्या संदर्भात भूमिका असंवेदनशील आहे. हा संप चिघळू नये, असे आम्हाला देखील वाटते. परंतु हे सरकार केवळ दमनशाहीच्या भरवशावर दाबून आणि लोकांवर विविध प्रकारची कारवाई करून, हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करेल, तर ते आंदोलन अजुन वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे आणि त्यातून मला असे वाटते की काहींना काही दिलासा या कर्मचाऱ्यांना सरकारने दिला पाहिजे. एवढ्या आत्महत्या झाल्यानंतरही सरकार जर जागे होत नसेल, तर मला हे चुकीचे वाटते. आमचे गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि आमचे विविध आमदार हे सगळेजण आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आंदोलन करत आहेत. मला असे वाटते याची दखल सरकारने घेतली पाहिजे. सरकारला पाहिजे तेवढे सहकार्य करायला, आम्ही देखील तयार आहोत, पण मार्ग काढून हा संप मिटवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवले.

त्याचबरोबर, कालच राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या तयारीबाबत देखील माहिती दिली. विधानपरिषदेची निवडणूक घोषित झालेली आहे. भाजपची जी राज्य निवडणूक समिती आहे, तिची लवकरच आम्ही बैठक घेऊ. भाजपाचे उमेदवार कोण असतील हे या बैठकीत आम्ही ठरवू आणि तशी शिफारस केंद्र व पक्षश्रेष्ठींना पाठवू. मग आमचे संसदीय मंडळ आणि आमचे अध्यक्ष त्याला मान्यता देतील, त्यामुळे नुकतीच घोषणा झाली आहे थोडी वाट बघा, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.