न्यायालयाचे रिया चक्रवर्तीची गोठावलेली बँक खाती पूर्ववत करण्याचे आदेश


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूपच चर्चेत होती. रिया चक्रवर्तीला सुशांतच्या मृत्यूप्रकरणानंतर एनडीपीएस कायद्यांतर्गत बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले होते. तसेच तिच्या अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. तिने या प्रकरणानंतर तिच्या या वस्तूंकरिता न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने नुकतीच यावर सुनावणी करत तिची खाती पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तिला तिच्या वस्तूही परत करण्यात याव्या, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे तिला मोठा दिलासा मिळाला आहे.

दाखल केलेल्या याचिकेत रियाने म्हटले आहे की, व्यवसायाने मी एक अभिनेत्री/ मॉडेल आहे. १६ सप्टेंबर २०२० रोजी कोणतीही नोटीस न देता एनसीबीने माझी बँक खाती आणि एफडी गोठवली होती. हा माझ्यावर करण्यात आलेला गंभीर अन्याय आहे. माझी बँक खाती गोठवल्यामुळे माझ्याकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी, जीएसटी भरण्यासाठी पैसे नाहीत तसेच इतर व्यवहारांमध्ये अडचणी येत आहेत. हे व्यवहार मी बँक खाती गोठवण्यात आल्यामुळे पूर्ण करु शकत नाही. त्यासाठी बँक खात्याची आवश्यकता आहे. तसेच त्या बँक खात्यातील रक्कमेतून मी माझा खर्च भागवते. माझा लहान भाऊ हा माझ्यावर अवलंबून आहे. माझी ही बँक खाती गेल्या १० महिन्यांपासून गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे ती लवकरात लवकर पूर्वस्थितीत करण्यात यावी, अशी मी विनंती करते.

एनसीबीची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान म्हणाले की, या सर्वांची सध्या आर्थिक चौकशी सुरू आहे. ती अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे या अर्जाला एनसीबीने विरोध केला. तसेच जर ती खाती पूर्वस्थितीत केली गेली, तर तपासात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश डी.बी. माने यांनी निकाल दिला. तपास अधिकाऱ्यांच्या जबाबावरून असे दिसून येते की, चक्रवर्ती यांची बँक खाती आणि एफडी गोठवण्यास एनसीबीकडून कोणताही तीव्र आक्षेप नाही. पण त्यासाठी तिला काही नियम आणि अटींचे पालन करुन बँक खाती किंवा एफडीसंदर्भातील माहिती सादर करणे आवश्यक असेल, असे न्यायालयाने सांगितले आहे.

तर दुसऱ्या याचिकेत रियाने तिचे गॅजेट्स, मॅकबुक प्रो, अॅपल लॅपटॉप आणि अॅपल आयफोन परत करण्याची मागणी केली आहे. याची योग्य पडताळणी झाल्यानंतर रिया चक्रवर्तीला तिचे गॅझेट परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भातील सुपूर्दनामाही तयार करुन घ्या. तसेच एक लाखांच्या बॉण्ड करुन तिला तिच्या वस्तू परत करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.