संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कळकळीचे आवाहन!


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन केले आहे. त्याचबरोबर, संपकरी आंदोलकांना प्रोत्साहन देणाऱ्यांना व विरोधकांवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. आंदोलनास कर्मचाऱ्यांना भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, असे मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत.

तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपकरी आंदोलकांना आवाहन करताना म्हणतात, तुम्ही आमचेच आहात एसटी कर्मचाऱ्यांनो, बाहेरचे नाहीत. तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, गेल्या काही दिवसांपासून राज्यशासन मनापासून प्रयत्न करीत आहे. शासनाने उच्च न्यायालयासमोर देखील आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून त्यावर न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केले आहे.

तसेच, माझी आपणास अशा परिस्थितीत हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आपण सर्वच जण आधीच अजूनही कोरोनाशी लढत आहोत. या विषाणूचा दोन वर्षांपासून मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढत असल्यामुळे शासनाच्या प्रयत्नांना कृपया सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच गरीब एसटी कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षांनी देखील चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नये, अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या, असे मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत.